करोनाच्या दुसऱ्या लाटेसंदर्भात सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले…

पुणे  – करोनाची पहिली लाट ओसरली त्यानंतर सारा देश गाफील राहिल्याने दुसऱ्या लटेचे संकट उभे राहिले. सध्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू आहे. पण या संकटाला भिडून तिला परत फिरावे लागेल अशी तयारी आपल्याला करायला हवी, असे मत व्यक्त करत सरसंघचालक मोहन भागवत यांनी नामोल्लेख टाळत कानपिचक्‍या दिल्या. पुण्याप्रमाणे सर्वांनी करोनाविरोधात एकत्रित लढायला हवेत, असे ते म्हणाले.

धैर्यवान लोक कायम प्रयत्न सुरू ठेवतात. भारताला एक समाज म्हणून सर्व भेदभाव विसरून, गुणदोषांच्या चर्चांमध्ये न अडकता एकसंघ बनून काम करावे लागणार आहे. एकमेकांच्या गुणदोषांची चर्चा करण्यासाठी नंतर वेळ मिळणारच आहे.

अजीम प्रेमजींनी सांगितलं त्यानुसार वेगाने काम करावं लागणार आहे. पुणे शहराचे उद्योजक, प्रशासक, रुग्णालय, जनतेचे प्रतिनिधी या सगळ्यांनी एक टीम म्हणून प्रयत्न केला. तसे सामुहिक प्रयत्न आवश्‍यक आहेत, असे ते म्हणाले.

सर्वांनीच वैज्ञानिकतेचा आधार घ्यावा. कोणतीही चर्चा ही वैज्ञानिकतेच्या आधारावरच तपासून कराव्यात. कुणी सांगते म्हणून ते योग्य किंवा नवीन अथवा जुनी गोष्ट म्हणून योग्य आहे असे माहितीच्या बाबत करू नका. आपल्याकडून कोणतीही निराधार बाब समाजात जाऊ नये याची काळजी घ्यायला हवी.

आयुर्वेदाच्या नावावर अनेक चर्चा अशा सुरू असतात. पण वैज्ञानिकतेच्या तर्कावर जोपर्यंत त्या गोष्टी सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत अशा गोष्टींबाबत सावध राहणे, आवश्‍यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

या जागतिक संकटासमोर कठीण संघर्ष होईल. पण तो आपण जिंकू, आपण जिंकायलाच हवा. ही परिस्थिती आपल्यातले दोष दाखवेल. दोष दूर करून सद्गुणांना वाढवून ही परिस्थिती आपल्याला शिकवेल. ही आपल्या धैर्याची परीक्षा आहे.

यश-अपयशाचा खेळ चालतच राहणार. सतत लढत राहण्याची हिंमत महत्त्वाची आहे. प्रयत्न करत राहा, निराश होण्याचे कारण नाही, अशा शब्दांत मोहन भागवत यांनी आवाहन केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.