रेल्वेच्या खासगीकरणाबाबत पियुष गोयल म्हणाले…

नवी दिल्ली : देशात रेल्वेच्या खासगीकरणाबाबत आणि खासगी ट्रेन चालवण्याच्या रेल्वे मंत्रालयाच्या निर्णयानंतर अधिकच चर्चा सुरू होत्या. यादरम्यान, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी याविषयी मोठे विधान केले आहे. त्यांच्या या विधानानंतर सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. रेल्वेचे कोणत्याही प्रकारे खासगीकरण करण्यात येणार नसल्याची माहिती पीयूष गोयल यांनी दिली.


रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. खासगी भागीदारीतून १०९ मार्गांवर १५१ अतिरिक्त अत्याधुनिक रेल्वे गाड्या चालवल्या जाणार आहेत. याचा सद्यस्थितीत सुरू असलेल्या रेल्वे गाड्यांवर कोणताही परिणाम होणार नाही. या रेल्वे गाड्यांमुळे नवे रोजगार निर्माण होणार असल्याची माहिती पीयूष गोयल यांनी दिली.

ज्या ठिकाणी सद्यस्थितीपेक्षा मागणी अधिक आहे त्याच मार्गांवर खासगी रेल्वेसेवा सुरू केली जाणार आहे. अत्याधुनिक रेल्वे गाड्यांमुळे प्रवाशांना अधिक सुविधा मिळणार आहेत. यामुळे सद्यस्थितीतील रेल्वे गाड्या आणि तिकिटांच्या दरावर कोणताही परिणाम होणार नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणं हेच यामागील कारण आहे,असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.