कर्जमाफीबाबत “कहीं खुशी, कहीं गम…’

दौंडच्या जिरायत भागातील शेतकरी संभ्रम
वासुंदे- सलग चार वर्षे दुष्काळ असणाऱ्या भागातील शेतकऱ्यांचे कर्ज गेले कित्येक महिने, वर्ष थकल्यामुळे आणि जिरायत भागातील शेतकऱ्यांची क्षेत्र मर्यादा जास्त असल्यामुळे येथील शेतकऱ्यांची कर्ज दोन लाखांपेक्षाही जास्त आहेत, त्यामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांची कर्जमाफीवर “कही खुशी, कही गम’ अशी अवस्था झाली असून, येथील शेतकरी सरकारच्या या घोषणेनंतर संभ्रमातच असल्याचे दिसून येत आहे.
या भागात शेतीसाठी कर्ज घेऊन गेले कित्येक महिने-वर्ष होऊन गेले. मात्र सततच्या दुष्काळामुळे येथील शेतकऱ्यांना कर्ज भरताच आले नाही, त्यामुळे येथील शेतकऱ्यांचा कर्जफुगवठा वाढलेला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जाचा आकडा दोन लाखांपेक्षा जास्त असून, मागील सरकारने अटी-शर्ती घालून तत्त्वतः सरसकट दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी केली होती. त्याचा कित्येक शेतकऱ्यांना फायदा झालाच नाही. या कर्जमाफीचा बोजवारा उडाल्याचे कित्येकवेळा सभागृहात चर्चेवेळी पाहिला मिळाले. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी फडणवीस सरकारच्या काळातील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत झालेल्या कर्जमाफीवर टीका करण्याची संधी सोडली नाही.
आमच्या सरकार आलं तर सरसकट कर्जमाफी देऊ असे बोललेले उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर बदलले की काय, असा प्रश्न शेतकरी करीत आहेत.
- शेतकऱ्यांची सरकारने केली बोळवण
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा करून दोन लाखांपर्यंत कर्जमाफी करण्याचे जाहीर केले. मात्र, एवढी अत्यल्प मदत शेतकऱ्यांना कर्जातून बाहेर काढणार नाही, शेतकऱ्यांचे कर्जमुक्ती करण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना व शेतकरी हिताच्या योजना आखण्याची गरज आहे. महाविकास आघाडीने केलेली दोन लाखांची कर्जमाफी ही शेतकऱ्यांची एक प्रकारची बोळवण केली असल्याचे शेतकरी बोलून दाखवत आहेत. सरसकट कर्जमाफीऐवजी दोन लाखांपर्यंत केलेली कर्जमाफी ही एक प्रकारची शेतकऱ्यांची थट्टाच आहे. - ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज हे दोन लाखापेक्षा कमी आहे अशा शेतकऱ्यांना मध्यम मुदत,ठिबक सिंचन,गायगोठा, शेती व शेतीपुरक अशा अन्य कर्जांच्या माध्यमातून अन्य सवलती मिळणे गरजेचे आहे व दोन लाखाची मर्यादा ही मोठ्या थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी खूपच कमी असल्याने ती वाढवून मिळावी अन्यथा भविष्यात शेतकरी आत्महत्यांचे लोन पुणे जिल्ह्यातील जिरायत भागात पोहोचल्या शिवाय राहणार नाही…
विलास जांबले, माजी चेअरमन वि. का.सोसायटी वासुंदे, अध्यक्ष शांताई शेतकरी बचत गट





