मुंबई: सिडको हे स्वायत्त बोर्ड आहे, त्याचे निर्णय मुख्यमंत्र्यांकडे येत नाहीत. यावरून कोणी राजकारण करू नये, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. कॅगेने सिडको संदर्भातील काही प्रकरणांमध्ये ताशेरे ओढले होते. त्यानंतर विरोधी नेत्यांनी भाजप व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. आज देवेंद्र फडणवीस यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.
फडणवीस म्हणाले, 2014 पूर्वीच्या दोन प्रकरणात कॅगने ताशेरे ओढले आहेत. त्यावेळी मुख्यमंत्रिपद पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होते. पण तरीही माझं हे मत आहे की सिडकोचा विषय मुख्यमंत्र्यांकडे येत नाही.
सिडकोबाबत 2013 ते 2018 या कालावधीतील अहवाल आहे. जर अनियमितता झाली असेल तर कारवाई करतील. पण मुख्यमंत्र्यांचा याच्याशी थेट संबंध येत नाही, हे आवर्जून सांगतो. नंतर कॅग रिपोर्ट यावर साक्ष होईल, त्यात समोर येईल, पण कॅगच्या रिपोर्टनंतर कामकाजात काही बदल करावे लागतील हे निश्चित आहे.