तब्बल साडेचारशे गाळे वापराविना बंदच, काहींचा आडमुठेपणा
पुणे – महात्मा फुले मंडईतील तब्बल साडेचारशे गाळे वापराविना बंदच आहेत. संबंधित गाळेधारक ते महापालिकेस परत देण्यास तयार नाहीत. “आपल्या अनेक पिढ्यांनी या ठिकाणी व्यवसाय केला आहे. त्यामुळे कुटुंबीयांच्या भावना गाळ्यात गुंतल्या आहेत. हवे तर भाडे घ्या, पण आमचा गाळा परत घेऊ नका’ अशी भूमिका या गाळेधारकांनी घेतली आहे.
महात्मा फुले मंडईत महापालिकेचे सुमारे 2 हजारांहून अधिक व्यावसायिक गाळे असून पालिकेने ते भाडेकराराने दिले आहेत. त्यातील जवळपास 450 गाळे गेल्या अनेक वर्षांपासून कोणताही व्यावसाय न करता बंद आहेत. दरम्यान, महापालिकेने ज्या गाळ्यांचा वापर मूळ भाडेकरू पुन्हा भाड्याने गाळा देऊन करत आहेत.
तसेच जे बंद आहेत, त्यांना नोटीस बजावून पालिकेस गाळे परत करण्याच्या सूचना केल्या आहेत. लॉकडाऊनपूर्वी पालिकेने या गाळ्यांची भाडेवाढही प्रस्तावित केली आहे. मात्र, त्याला अनेक व्यावसायिकांनी विरोध केला आहे. शिवाय बंद असलेले गाळे परत देण्यासही नकार दिला आहे. तसेच भाडेवाढ मान्य नसल्याने अनेकांनी या कोर्टात धाव घेतली आहे. शिवाय अनेकांनी गेल्या आठ महिन्यांचे भाडेच भरलेले नाही. त्यामुळे आता वसुली तसेच बंद गाळे ताब्यात घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे.
हवे तर भाडे घ्या पण गाळा बंदच राहू द्या
बंद असले, तरी ते गाळे परत करण्यास अनेकांनी नकार दिला आहे. “आमच्या अनेक पिढ्यांनी येथे व्यवसाय केला आहे. आज आम्ही गाळा वापरत नसलो, तरी या आमच्या पूर्वजांच्या आठवणी आहेत. त्यामुळे आम्ही भाडे देऊ मात्र, गाळा घेऊ नका’ अशी भूमिका गाळेधारकांनी घेतली आहे. त्यामुळे पालिकेची कोंडी झाली आहे, तर अनेकांकडे ही मंडई बांधल्यापासूनहा गाळा आपल्याकडे असल्याची कागदपत्रे आहेत. हा आमच्या कुटूंबाचा वारसा असल्याने तो परत घेऊ नये, अशी मागणीही केली आहे.