दानवेंविरोधातील याचिकेची तातडीने सुनावणी घेण्यास नकार

मुंबई : “मी असेपर्यंत खुशाल गाई कापा. तुम्हाला कोणीही रोखणार नाही’, असे वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा. तसेच तो वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावरुन तत्काळ हटविण्याचे आदेश द्या, अशी विनंती करणाऱ्या याचिकेची तातडीने सुनावणी घेण्यास सुटीकालीन न्यायालयाने आज नकार दिला. न्यायमूर्ती के.के. तातडे यांनी नियमित न्यायालयासमोर सुनावणी घेण्याचे निर्देश याचिकाकर्त्यांला दिली. त्यामुळे 4 नोव्हेंबरला संबंधीत याचिका न्यायालयाच्या निर्देशनास आणून देण्यात येणार आहे.

भोकरदन मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे यांनी निवडणूक लढवली. आपल्या मुलाच्या प्रचारासाठी 19 ऑक्‍टोबर रोजी कटोरा बाजार या मुस्लिमबहुत भागात सभेच्यावेळी रावसाहेब दानवे यांनी मुस्लिमांना खुश करण्यासाठी “मी असेपर्यंत गाई खुशाल कापा. तुम्हाला कोणीही रोखणार नाही’ असे वक्तव्य केले. त्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला.

दानवेंच्या या वक्तव्यामुळे आपल्या भावना दुखावल्या गेल्या असून त्यांच्या विरोधात पोलीस एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्याने दानवे यांच्या विरोधात गुन्हे दाखल करा, अशी विनंती करणारी याचिका डॉ. विनोद कोठारी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.