खेड सेझबाधितांना मिळणार परतावा

मंत्री सदाभाऊ खोत यांचे शेतकऱ्यांना आश्‍वासन

दावडी -खेड सेझ प्रकल्पबाधित शेतकऱ्यांची राज्याचे कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांच्या समवेत 15 टक्के परतावा प्रश्‍नासंदर्भात बैठक झाली. बैठकीत परतावा प्रश्‍न मार्गी लावणार, असे आश्‍वासन मंत्र्यांनी दिले आहे.

2008 साली खेड तालुक्‍यातील पूर्व भागामध्ये महाराष्ट्र शासन व केंद्र सरकारने (सेझ प्रकल्प) विशेष आर्थिक क्षेत्र जाहीर करण्यात आला. त्यानंतर या भागातील निमगाव, दावडी, गोसासी, कन्हेरसर, केंदूर या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करण्यात आल्या होत्या. शेतकऱ्यांनी भूसंपादन अंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या सहमतीने हेक्‍टरी दर ठरविण्यात आला. शेतकऱ्यांना 15 टक्के मोबदला परतावा वगळता इतर रक्कम देण्यात आली, काहीच दिवसात परतावा देण्यात येईल असे आश्‍वासन देण्यात आले होते; मात्र अद्याप परतावा देण्यात आला नाही.

याविषयी मंत्रालयायत सेझबाधित शेतकऱ्यांची कृषी, पणन व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या समवेत चर्चा झाली. खोत यांनी हा प्रश्‍न लवकरात लवकर सोडवण्यासाठी उद्योगमंत्री व मुख्यमंत्री यांच्या समवेत केडीएल प्रतिनिधी, एमआयडीसी अधिकारी, केआयपील प्रतिनिधी व सेझबाधित शेतकरी प्रतिनिधी यांच्या संयुक्त बैठका लवकरात लवकर आयोजित करुन प्रश्‍न मार्गी लावण्याचे ठोस आश्‍वासन सेझबाधित शेतकऱ्यांना दिले आहे.

यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले, सेझ 15 टक्के प्रश्‍न मला जवळून माहिती असून या प्रश्‍नाच्या संदर्भातील आंदोलनात मी स्वतः सहभागी झालो आहे. त्यामुळे हा प्रश्‍न शासकीय पातळीवर सोडवण्यात येईल. दिलेल्या ठोस आश्‍वासनामुळे सेझबाधित शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत या बैठकीस कनेरसर, गोसासी, निमगाव, दावडी, केंदूर या गावातील शेतकरी उपस्थित होते. त्यामध्ये काशीनाथ हजारे, एकनाथ गोरडे, बाळासाहेब माशेरे, विश्‍वास कदम, गजानन गांडेकर, धीरज मुटके आदी उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here