पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) सेक्टर ३० येथील कन्वेनियंस शॉपिंग सेंटरमधील गाळ्यांची देखभालदुरुस्ती करण्यासाठी गाळेधारकांना शुल्क आकारण्यात आले. परंतु, मागील एक वर्षात देखभाल दुरुस्तीसह कोणत्याही सुविधा देण्यात आल्या नाहीत. यामुळे गाळेधारकांनी पीएमआरडीएवर नाराजी व्यक्त करत प्रतिगाळा जमा केलेले देखभाल दुरुस्ती शुल्क परत घेण्यासाठी पीएमआरडीएकडे अर्ज केला आहे.
पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यात पीएमआरडीए अंतर्गत विविध विकास प्रकल्प विकसित केले जात आहेत. सेक्टर १२ येथील साडेसहा हजार घरांचा प्रकल्प सध्या वेगाने सुरु आहे. त्याचबरोबर सेक्टर ३० येथे कन्व्हेनियंस शॉपिंग सेंटर विकसित करण्यात आले असून त्यातील गाळ्यांचा ताबा मागील वर्षी देण्यात आला. शॉपिंग सेंटरमधील गाळ्यांच्या दैनंदीन देखभाल दुरुस्तीसह गाळेधारकांना तत्सम सुविधा देण्यासाठी ६४ हजार ५०० इतके शुल्क आकारण्यात आले. या कामासाठी गाळेधारक आणि पीएमआरडीए यांच्यात कायदेशीर करार झाला. शुल्क जमा करुन दहा ते अकरा महिने उलटले तरी पीएमआरडीएकडून कसल्याही सुविधा पुरवल्या नसल्याची तक्रार गाळेधारकांनी केली आहे.
शॉपींग सेंटरमधील विद्युत वापराचे कॉमन वीज बिल महावितरणशी संबंधित विद्युत कार्यालयात जमा केले नाही. परिणामी, महावितरणकडून २३ नोव्हेंबर २०२४ रोजी विद्युत प्रवाह खंडित केला आहे. सोसायटी स्थापन करण्याची प्रक्रिया करुन देण्याचे आश्वासन दिले होते. अद्याप ती प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. गाळेधारकांच्या मालमत्तेची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडे नोंद केलेली नाही. शॉपिंग सेंटरमध्ये हक्काचे नळ कनेक्शन नाही. त्याबाबत पालिकेकडे पत्रव्यवहार केलेला नाही. ऑन ग्रीड मीटर नसल्यामुळे सोलर यंत्रणा कार्यारत नाही. लिफ्टसाठी बॅकअप बॅटरी उपलब्ध नाही. प्रत्येक मजल्यावर बाल्कनीमध्ये पाणी साचते. परिणामी, दुकानांमध्ये पाणी शिरत असून त्याचा गाळाधारकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. पावसाच्या पाण्याला आऊटलेट करुन दिलेला नाही.
स्वच्छतागृहातील नळ व इतर वस्तू चोरीला गेल्या आहेत. वारंवार कळवूनही त्याठिकाणी नवीन वस्तू बसविण्यात आलेल्या नाहीत. देखभाल दुरुस्ती अभावी स्वच्छतागृहांची अशी अवस्था झाली आहे. शेजारी काम सुरु असलेल्या एलोरा कन्स्ट्रक्शन यांनी त्यांच्या कामासाठी इमारतीच्या परिसरातील इंटरलॉक ब्लॉक्स व रॅम्प काढले आहे. काम पूर्ण केल्यानंतर त्यांनी हे ब्लॉक्स व्यवस्थित बसविले नाहीत. परिसरात मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे गाळेधारकांनी पीएमआरडीए प्रशासनावर नाराजी व्यक्त करत देखभाल दुरुस्तीसाठी जमा केलेले शुल्क परत करावेत, अशी मागणी करत गाळेधारकांनी अर्ज केला आहे. गाळेधारक गणेश जाधव, विजय लंके, वरुण पोकळे, मोहिनी भोंडवे, स्वप्नील शिराळ, स्वप्नील भालेकर, सुयोग चोपडा, मच्छिंद्र कुमावत, योगेश बेलदार, सुहास मवाळ, रितेश भावसार, शैलेश हंडी आदींनी शुल्क परत करण्याची मागणी केली आहे.
आश्वासन देऊन फसवले
गाळेधारकांची एक.ित्रत सोसायटी स्थापन झाल्यानंतर गाळेधारकांनी देखभाल दुरुस्तीसाठी भरलेले शूल्क सोसायटीच्या खात्यावर जमा करण्याचे आश्वासन पीएमआरडीएच्या तत्कालीन अधिका-यांनी दिले होते. त्यावर समस्या सोडविण्याबाबत कार्यकारी अभियंता प्रभाकर वसईकर यांच्याकडे अर्जाद्वारे मागणी केली. लवकरात लवकर आपल्या सर्व समस्या सोडविण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले. या आश्वासनावर आम्ही विश्वास ठेवला. परंतु, आमचा भ्रमनिरास झाला, अशा शब्दांत गाळेधारकांनी पीएमआरडीएवर नाराजी व्यक्त केली.