नवी दिल्ली -बिहारमधील राजदचे नेते श्याम रजक यांनी येथे लोजपचे नेते चिराग पासवान यांची भेट घेतली. त्यामुळे बिहारमधील भाजपविरोधी आघाडीत चिराग यांना आणण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे मानले जात आहे.
चिराग आणि त्यांचे काका पशुपतीकुमार पारस यांच्यात सध्या लोजपचा ताबा मिळवण्यावरून संघर्ष सुरू झाला आहे. अशात पारस यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली. त्यामुळे भाजपने चिराग यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचे मानले जात आहे.
त्यातून भाजपशी संबंध तोडण्याशिवाय चिराग यांच्याकडे दुसरा पर्याय उरलेला नाही. त्यामुळे रजक यांनी चिराग यांच्या घेतलेल्या भेटीचे महत्व वाढले आहे. राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनीच हातमिळवणीचा संदेश घेऊन रजक यांना पाठवल्याचे मानले जात आहे.
चिराग बिहारमधील विरोधकांच्या आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय घेणार का, याविषयी उत्सुकता आहे. लोजपमध्ये गृहकलह सुरू झाल्यावर भाजपने मौन बाळगल्याबद्दल चिराग यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली.
आता काकांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देऊन भाजपने चिराग यांना आणखीच डिवचल्याचे मानले जात आहे.