जयपूर – राजस्थानमधील कॉंग्रेस सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित कराच्या (व्हॅट) दरात 2 टक्क्यांनी कपात केली. त्यामुळे इंधन दर काही प्रमाणात कमी झाल्याने त्या राज्यातील जनतेला अल्पसा का होईना पण दिलासा मिळाला आहे.
सार्वजनिक इंधन कंपन्यांनी चालू महिन्यात अनेकदा दरवाढ केल्याने देशाच्या विविध भागांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती उच्चांकी पातळीवर पोहचल्या आहेत. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये तर प्रीमियम पेट्रोलच्या दराने थेट शंभरी पार केली.
त्यानंतर राजस्थानच्या जनतेला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले. त्यामुळे राजस्थानमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर सुमारे दीड रूपयाच्या आसपास कमी झाले. व्हॅटच्या दरात कपात केल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केंद्रीय कर कमी करून मोदी सरकारने जनतेला आणखी दिलासा द्यावा, अशी मागणी केली.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधनांच्या किमती प्रदीर्घ काळपासून नीचांकी स्तरावर आहेत. तसे असूनही मोदी सरकारकडून इंधनांवर अधिक प्रमाणात उत्पादन शुल्क आकारले जात आहे. ते सरकार प्रतिलिटर पेट्रोलवर 32 रूपये 98 पैसे, तर डिझेलवर 31 रूपये 83 पैसे उत्पादन शुल्क वसूल करत आहे, याकडेही गेहलोत यांनी लक्ष वेधले.