मेक्सिको – जागतिक बाजारात तेलाचे दर पडल्याने मेक्सिको वगळता इतर सर्व प्रमुख तेल उत्पादक कंपन्यांनी जुलै पर्यंत तेल उत्पादन दर दिवशी 1 कोटी पिंपे व वर्षांअखेरीस 80 लाख पिंपांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टींग कंट्रीज अर्थात ओपेक या तेल उत्पादक व निर्यातदार देशांच्या बैठकीत उत्पादन कमी करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मेक्सिकोने मात्र या निर्णयाला मान्यता दिलेली नाही. तेलाचे दर दोन दशकातील नीचांकी पातळीवर गेल्याने घसरण थांबवण्यासाठी तेल उत्पादक कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. मेक्सिकोने त्यांच्या वाट्याचे तेल उत्पादन दिवसाला चार लाख पिंपानी कमी करणे गरजेचे आहे. मात्र, मेक्सिको दिवसाला 1 लाख पिंपे उत्पादन कमी करण्यास तयार आहे, मेक्सिकोच्या ऊर्जा मंत्री रोसिओ नहले गार्सिया यांनी म्हटले आहे.
मेक्सिकोवगळता अन्य प्रमुख देश कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात करण्यासाठी तयार असल्याची माहिती ओपेककडून देण्यात आली आहे. ओपेक आणि अन्य मुख्य तेल उत्पादन देशांनी किमतीमधील मोठया प्रमाणात होणारी घसरण थांबविण्यासाठीची चर्चाही केली आहे. त्यानंतर उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेतला गेल्याचे सांगितले आहे. तेल उत्पादन करणाऱ्या देशांची ओपेककडून व्हिडीओ परिषद घेण्यात आली. यात जुलै ते डिसेंबर या कालावधीत 80 लाख बॅरेल प्रतिदिन उत्पादनात कपात करण्याचा करारावर एकमत झाले आहे. परंतु यात मेक्सिकोने सहमती दिलेली नाही.