इतर बॅंकांकडूनही कपातीची घोषणा
नवी दिल्ली – सार्वजनिक क्षेत्रातील युनियन बॅंक ऑफ इंडियाने शुक्रवारी मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडस् बेसड् व्याजदरात म्हणजे एमसीएलआरमध्ये 0.20 टक्क्यांची कपात केली आहे. ही व्याजदर कपात 11 जुलै पासून अंमलात येणार असल्याचे बॅंकेने म्हटले आहे.
यामुळे बॅंकेचा एक वर्षासाठीचा एमसीएलआर आता 7.40 टक्के झाला आहे. तो अगोदर 7.60 टक्के होता. तीन महिने आणि सहा महिन्यांसाठीचा एमसीएल अनुक्रमे 7.10 टक्के आणि 7.25 टक्के इतका करण्यात आला आहे. गेल्या वर्षाच्या जुलै महिन्यापासून युनियन बॅंक ऑफ इंडिया केलेली ही तेरावी व्याजदर कपात आहे. या अगोदरच स्टेट बॅंकेने एमसीएलआर दरामध्ये 0.05 ते 0.10 टक्क्यांपर्यंत कपात जाहीर केलेली आहे. ही कपात कमी कालावधीच्या कर्जासाठी असल्याचे बॅंकेने म्हटले आहे.
इंडियन ओव्हरसीज बॅंकेने सर्व कालावधीच्या एमसीएलआरमध्ये पाव टक्क्याची कपात अगोदरच जाहीर केली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला कॅनरा बॅंक आणि महाराष्ट्र बॅंकेने एमसीएलआरमध्ये अनुक्रमे 0.10 व शून्य 0.20 टक्क्यांची कपात जाहीर केलेले आहे. रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात मोठ्या प्रमाणात कपात जाहीर केल्यानंतर इतर बॅंका कर्जावरील व्याजदरात कपात जाहीर करीत आहेत.