नवी दिल्ली – जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर परिषदेची 44वी बैठक आज केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. कोविड -19 मध्ये मदत आणि व्यवस्थापनात वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट वस्तूंवरील जीएसटी दरात 30 सप्टेंबर 2021 पर्यंत कपात करण्याचा निर्णय परिषदेने आपल्या बैठकीत घेतला आहे.
जीएसटी परिषदेने लसींवर पाच टक्के कर दर कायम ठेवण्यास सहमती दर्शविली आहे. केंद्र सरकार 75% लस विकत घेईल आणि जीएसटी देखील देईल, परंतु जीएसटीमधून मिळणारे 70 टक्के उत्पन्न हे राज्यांसह वाटून घेतले जाईल. ब्लॅक फंगसचे आणि टोसिलिजुमाब इंजेक्शनवर आधी 5 टक्के कर होता. तो कर रद्द करण्यात आला आहे.
करोना टेस्टिंग किटवरील कर 12 वरून 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. तसेच हॅंड सॅनिटायझरवरील कर 18 ते 5 टक्क्यांपर्यंत करण्यात आला असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
रुग्णवाहिकांवरचा जीएसटी 28 टक्क्यांवरून 12 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. पल्स ऑक्सिमीटरवरील जीएसटी 12 वरून 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. तसेच ऑक्सिजन कंसेन्ट्रेटरवर कर कमी केला आहे.
ब्लॅक फंगसच्या औषधांवर कोणताही कर लावला जाणार नाही. व्हेंटिलेटरवरील जीएसटीही 12 वरून 5 टक्क्यांवर आणला आहे. करोना रूग्णांच्या उपचारासाठी वापरल्या जाणार्या रेमडेसिविर या औषधावरील करही कमी करण्यात आला आहे. तो 12 ते 5 टक्क्यांपर्यंत कमी केला, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली.
या बैठकीला केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री आणि अर्थ मंत्रालयातील तसेच राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यापूर्वी 28 मे रोजी झालेल्या जी एस टी परिषदेच्या बैठकीत कोविड 19 संदर्भातील सामुग्री अर्थात वैद्यकीय द्रवरूप ऑक्सिजन, ऑक्सिजन कॉन्स्नट्रेटर, ऑक्सिजनची वाहतूक आणि साठवणूक, लसी, चाचणी किट्स आदि वस्तूवरील करात सवलत देण्यात आली होती, ती 31 ऑगस्ट पर्यंत कायम राहणार आहे.
तसेच लहान आणि मध्यम करदात्यांना लागू असणाऱ्या काही नियमात शिथिलता, आणि लहान करदात्यांना, कर परतावा भरताना विलंब शुल्क माफ करण्याचा निर्णय ही या बैठकीत घेण्यात आला होता.