करोनामुळे गुन्हेगारी घटनांत घट

चोरट्यांना सावज सापडेनात : वाटमारी बंद


एसटी आणि पीएमपी बसमधील चोऱ्याही थांबल्या

पुणे – करोनाचा फटका व्यापार, उद्योग क्षेत्रांना बसला आहे. याचा परिणाम हातावर पोट असणाऱ्या मोलमजुरांवरही झाला आहे. त्यांचा हातचा रोजगार हिरावल्या गेल्याने उपासमारीची वेळ आली आहे. तर दुसरीकडे शहरातील गुन्हेगारीतही घट झाली आहे. प्रामुख्याने रस्त्यावरील वाटमारी, चेन स्नॅचिंग आणि बसमधील चोऱ्या जवळपास बंदच झाल्या आहेत. मंगळवारी (दि.24) शहरातील पोलीस ठाण्यात एकही गुन्हा दाखल नसल्याचे पोलीस दप्तरी असलेल्या नोंदीवरून दिसून येते. यामध्ये जेवढा करोनाचा प्रभाव आहे, तेवढाच पोलीस रस्त्यावर असल्याचाही आहे. मात्र, परिस्थिती पूर्ववत होताच चोरटे धुमाकुळ घालण्याची शक्‍यता आहे.

पुणे शहरात वाटमारी (स्ट्रीट क्राईम) मोठ्या प्रमाणात होते. रस्त्यावरून चालणाऱ्यांचे मोबाइल, सोनसाखळी हिसकावणे, धारदार शस्त्राचा धाक दाखवून किंमती ऐवज हिसकावणे, दारूच्या नशेत मारहाण करणे आदी गुन्हे घडतात. रात्रीबरोबर दिवसाही असे गुन्हे शहराच्या विविध भागांत घडतात. सरासरी दररोज 2 ते 3 गुन्ह्यांची नोंद विविध पोलीस ठाण्यात होत असते. पोलिसांनी नियमित नाकाबंदी, गस्त आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करूनही असे प्रकार कमी होताना दिसत नाहीत. मात्र, करोनामुळे मागील आठवडाभरात रस्त्यावर कोणत्याही प्रकारची वर्दळ नसल्याने गुन्हेगारांना सावज आढळत नाही. तर पीएमपी बस रिकाम्या धावत असल्याने गर्दी करून महिलांजवळील मंगळसूत्र, पर्समधील किमती ऐवज चोरणाऱ्या टोळ्यांनाही सावज मिळेनासे झाले आहेत.

मंगळवारी एकही गुन्हा दाखल नाही
करोनाचा चांगलाच धसका शहरातील सराईत गुन्हेगारांनी घेतल्याचे दिसते. करोनाचा वाढता प्रभाव पहाता नागरिकांत मोठी भीती आहे. साहजिकच गुहेगारांनी सुद्धा याची मोठी धास्ती घेतली आहे. जणू काही आता गुन्हेगार अंडरग्राउंड झाले आहेत की काय असे चित्र निर्माण झाले आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालून ती मोडीत काढण्यासाठी पोलिसांकडून सतत उपाययोजना करण्यात येत असतात. यासाठी विशेष मोहिमा हाती घेतल्या जातात. प्रत्येक आठवड्याच्या बैठकीत या सर्व बाबींचा आढावा घेतला जातो. तरीदेखील सराईत गुन्हेगार त्यांची गुन्हेगारी कृत्य करत असतात. परंतु, मागील तीन ते चार दिवसांपासून करोनाची चांगलीच दहशत गुन्हेगारात पसरली आहे. पुणे पोलीस आयुक्‍तालयाच्या हद्दीत दिवसाकाठी 10 ते 15 गुन्ह्यांची नोंद होते. चार दिवसांपासून गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण तीन ते चारवर आले असतानाच मंगळवारी तर चक्‍क एकही गुन्हा दाखल झाला नाही.

पोलिसांनी 185 पेक्षा अधिक ठिकाणी बॅरिकेटिंग करून चेकनाके उभारले आहेत. विनाकारण शहरात फिरणाऱ्या लोकांना आळा घालण्यासोबतच तपासणीसुद्धा करत आहेत. त्यामुळे बंदच्या काळात पोलिसांचा कडक बंदोबस्त अनेक गुन्हेगारी घटना रोखण्यासाठी महत्त्वाचा ठरत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.