पाळीव प्राण्यांपासून करोनाचा धोका कमी

डब्ल्युएचओने केले स्पष्ट

जिनिव्हा – जगभरात करोनाचा हाहाकार सुरू असताना पाळीव प्राण्यांपासून करोनाची बाधा होऊ शकते अशा चर्चा गेले काही दिवस सोशल मीडियावर सुरु आहेत. याची दखल घेत जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्युएचओ) असा धोका होण्याचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे मत व्यक्त केले आहे.

चीनकडून जगभरात पसरलेला करोनाचा धोका मुख्यत्वे वटवाघूळ व खवले मांजर यांच्यामार्फत पसरला असे वृत्त व्हायरल झाले होते. मात्र, घरातील पाळीव प्राण्यांपासून रहिवाशांना असा धोका होण्याचे प्रमाण खूपच नगण्य असल्याचेही संघटनेने म्हटले आहे. अशा घटना सातत्याने घडल्याचे कोणत्याही देशात दिसून आलेले नाही. याचे प्रमाण अत्यंत अल्प असून योग्य काळजी घेतली तर प्राण्यांनाच नाही तर त्यांच्या सानिध्यात येत असलेल्या व्यक्तींनाही हा धोका होणार नाही.

जगभरात 5 लाखांपेक्षाही जास्त बळी करोनाने घेतले आहेत. जगात काही पाळीव प्राण्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले असले तरीही त्यात मुख्यत्वे भटकी जनावरे आहेत. रस्त्यावरील अशा जनावरांना खाण्याचे पदार्थ प्राणीमित्र संघटना तसेच काही नागरिक देत आहेत. मात्र, त्यांनी मास्क व फेस शिल्डचा वापर केला तर हा धोका होणार नाही. तसेच काही अंतर राखून या जनावरांना अन्नपदार्थ दिल्याने या धोक्‍यापासून लांब राहणे शक्‍य आहे, त्यामुळे अफवांवर विश्‍वास न ठेवता, योग्य काळजी घेतली तर हा धोका होणारच नाही, असेही संघटनेने सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.