शिवसेनेची महापालिका आयुक्तांकडे मागणी
पुणे – करोनाच्या संकटामुळे महापालिकेच्या उत्पन्नात होणारी घट विचारात घेऊन नगरसेवकांच्या मानधनात कपात करावी, अशी मागणी शिवसेनेने महापालिका आयुक्तांकडे केली आहे. सर्व गटनेत्यांशी एकत्र चर्चा करून आयुक्तांनी हा निर्णय घ्यावा, असे या निवेदनात म्हटले आहे.
शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, महापालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार आणि सहसंपर्कप्रमुख श्याम देशपांडे यांच्या शिष्टमंडळाने आयुक्त शेखर गायकवाड यांना मागणीचे निवेदन दिले.
तर, मिळकत कर व बांधकाम परवाना शुल्क वाढीवर लक्ष केंद्रीत करणे, अनधिकृत घरांसाठी अमनेस्टी योजना, नगरसेवकांचे मानधन कपात, 800 चौरस फुटापर्यंत घरांना मिळकत कर माफी या मागण्यांचा समावेश आहे. जवळपास 70 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. जीएसटीमधील अपेक्षित वाटा कमी होणार आहे. त्यामुळे महापालिका अंदाजपत्रकाची पुनर्मांडणी करणे आवश्यक असून, उत्पन्नाचे मुख्य स्रोत मिळकत कर, बांधकाम परवाना, शुल्क वाढीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे.
अनधिकृत घरांची 400 कोटी थकबाकी
अनधिकृत घरांसाठी 2008 पासून महापालिका तिप्पट दराने घरपट्टी आकारत आहे. ही कर आकारणी अवाजवी असल्याने नागरिक कर भरत नाहीत. त्यांची 400 कोटी रुपये थकबाकी आहे. त्यांना एखादी योजना लागू करून नागरिकांना मूळ रकमेवर अधिक अर्धा दर आकारल्यास जवळपास 175 कोटी रुपये महापालिकेकडे जमा होतील, असे निवेदनातून सूचवण्यात आले आहे.