पेट्रोल, डिझेलचे दर कमी करा- कॉंग्रेस

नवी दिल्ली : केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या किंमती 2004 साली होत्या तितक्‍या कमी कराव्यात अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे. जागतिक बाजारात क्रूड तेलाच्या किंमती मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे सरकारने पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी कराव्यात.

पेट्रोलची किंमत लीटरमागे 60 रुपये इतकी कमी करावी, अशी मागणी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे. पेट्रोल आणि डिझेलला “जीएसटी’ खाली आणण्याची मागणीही राहुल गांधी यांनी केली आहे. 

“निवडणून आलेले सरकार अस्थिर करण्यात व्यस्त असणाऱ्या पंतप्रधानांना जागतिक पातळीवरील तेलाच्या घटलेल्या किंमती लक्षात आल्या नसाव्यात. भारतीयांना या घटलेल्या दरांचा फायदा करून द्यव. लीटरमागे 60 रुइपये दर द्यावा.

यामुळे रखडलेल्या अर्थकारणाला प्रोत्साहन मिळेल.’ असे राहुल गांधी यांनी ट्‌विटरवर म्हटले आहे. पेट्रोलमध्ये लीटरमागे 2.69 रुपये आणि डिझेलला 2.33 रुपयांची सवलत अगदी क्षुल्लक आहे.

नोव्हेंबर 2004 मध्ये क्रूड तेलाचे दर प्रति बॅरल 38.9 डॉलर इतके होते. तेंव्हाइतकेच दर पेट्रोल आणि डिझेलला देण्यात यावेत, असे गांधी यांनी म्हटले आहे.

कॉंग्रेसचे युवा नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मंगळवारी पक्ष सोडला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे मध्यप्रदेशातील कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसचे सरकार कोसळण्याच्या बेतात आले आहे.

त्या पार्श्‍वभुमीवर राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून ही टीका केली आहे. मोदी-शहा सरकारने कमी कच्च्या तेलाच्या दराचा फायदा करुन तातडीने पेट्रोल-डिझेल-एलपीजीचे दर कमी केले पाहिजेत, असे कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनीही म्हटले आहे.

पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे लिटरमागे 2.69 रुपये आणि 2.33 रुपये इतकी सवलत देणे ही नगण्य आणि गवताच्या गंजीमध्ये सुई इतकी आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचे दर नोव्हेंबर 2004 च्या पातळीपर्यंत कमी करावेत, असे ते म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.