करोना काळातही लालफीतशाही कारभार

पुणे विद्यापीठातील चाचणी केंद्र मान्यतेच्या प्रक्रियेत अडकले

पुणे – करोना आपत्ती काळातही प्रशासकीय लालफीतशाही कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. पहिल्या लाटेवेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कोविड चाचणी केंद्रासाठी प्रयोगशाळा उभारण्याची घोषणा केली होती. आता दुसऱ्या लाटेचा कहर सुरू असतानाही, प्रयोगशाळा अजूनही मान्यतेच्या प्रक्रियेत अडकली आहे. त्यावरून टीका होताच विद्यापीठाने हालचाली सुरू केल्या आहेत.

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) बरोबरच ससून रुग्णालय आणि आयसर या संस्थेमध्ये करोना चाचणी करण्यास परवानगी देण्यात आली. तसेच खासगी प्रयोगशाळांनाही चाचणीची परवानगी मिळाली. त्यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पुढाकार घेत प्रयोगशाळा उभारण्याची तयारीदेखील दर्शवली. परंतु, सुमारे वर्षभरानंतरही मान्यतेअभावी ही प्रयोगशाळा सुरू झाली नाही. त्यावरून विद्यापीठाला टीकेला सामोरे जावे लागत आहे. आता येत्या आठवडाभरात विद्यापीठात करोना चाचणी केंद्र सुरू होण्याची चिन्हे आहेत. मान्यतेची प्रक्रिया पूर्ण होताच दररोज सुमारे100 रुग्णांची तपासणी करणे शक्‍य होणार आहे, असे प्रशासनाने यापूर्वी दिलेल्या माहितीत सांगितले होते.

दरम्यान, सद्यःस्थिती पुणे शहरात रोज सुमारे 20 हजारांपेक्षा जास्त नमुने (स्वॅब)घेतले जात असल्याने त्याचा ताण प्रयोगशाळांवर येत आहे. विद्यापीठाच्या प्रयोगशाळेची रोजची क्षमता सुमारे 400 ते 500 आहे. मात्र, सुरुवातीला 100 चाचण्या घेतल्या जाणार आहेत. विद्यापीठाकडे प्रयोगशाळेत काम करण्यासाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे. तसेच विद्यापीठाने स्थानिक पातळीवरुन प्रयोगशाळेसाठी लागणारी उपकरणे मिळवली आहे. त्यामुळे आता केवळ मान्यतेची प्रतीक्षा आहे. तर, “याबाबत आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता केली आहे. येत्या तीन ते चार दिवसांत एएफएमसीचे अधिकारी तपासणी करून प्रयोगशाळेला मान्यता देतील,’ असे विद्यापीठाचे म्हणणे आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.