भाव तेजीत राहण्याचे संकेत : हंगाम लांबल्याने आवक कमी
अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले
भाव जवळपास दुपटीने वाढण्याची शक्यता
पुणे – थंडीच्या हंगामात बाजारात दाखल होणाऱ्या लालचुटुक स्ट्रॉबेरीचा हंगाम यंदा दोन महिन्यांनी पुढे ढकलला आहे. त्यामुळे हंगामात आवक कमी आणि भाव जास्त असे समीकरण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे खास नाताळा करितादेखील स्ट्रॉबेरी कमी प्रमाणात उपलब्ध होणार असून, भाव जवळपास दुपटीने वाढण्याची शक्यता आहे.
नगदी पीक म्हणून स्ट्रॉबेरीकडे पाहिले जाते. महाबळेश्वर, वाई परिसराबरोबरच पुणे जिल्ह्यातील जुन्नर, भोर, वेल्हा, सासवड, आंबेगाव, बारामती या भागांतदेखील स्ट्रॉबेरीची लागवड होते. मॉन्सुनचे लांबलेले आगमन व अवकाळीचा फटका या हवामान बदलाचा परिणाम स्ट्रॉबेरीच्या लागवडीवर झाला आहे. वातावरणातील बदलामुळे महाबळेश्वर, वाई, जावळी तालुक्यांतील स्ट्रॉबेरीच्या लागवडीवर परिणाम झाला आहे.
दिवाळीपासून बाजारपेठांमध्ये स्ट्रॉबेरीची आवक सुरू होत असते. मात्र, अद्यापही स्ट्रॉबेरीची आवक सुरू झालेली नाही. अवकाळी पावसाने घेतलेल्या विश्रांतीनंतर महाबळेश्वर तालुक्यातील मेटगुताड, भिलार, भोसे, खिंगर, अमराळ, राजपुरी, वाई, जावळी परिसरांत काही दिवसांपासून स्ट्रॉबेरीची लागवड आता सुरू केली आहे. त्यामुळे यंदाचा हंगाम पूर्ण क्षमतेने हाती लागणार नसल्याचे चित्र आहे. पुणे जिल्ह्यातील परिस्थितीदेखील अशीच आहे.
नाताळही स्ट्रॉबेरीविना साजरा करावा लागणार
नाताळात गोव्याबरोबरच परदेशातही स्ट्रॉबेरीला चांगली मागणी असते. या काळात उत्पादकांना चांगला भाव मिळत असल्याने स्ट्रॉबेरीचे उत्पादन महिनाभर आगोदारच सुरू व्हावे, याकरिता शेतकऱ्यांचे नियोजन असते. मात्र, यंदा अवकाळीने शेतकऱ्यांचे हे नियोजनच कोलमडले आहे.
महाबळेश्वर परिसरातून दोन टन होणारी आवक अवघी 500 किलोवर पोहोचली आहे. गेल्यावर्षी स्ट्रॉबेरीला प्रतिकिलोला 100 ते 150 रुपये भाव मिळाला होता. यंदा तो 200 ते 300 एवढा आहे. याशिवाय नाताळातदेखील आवक कमीच राहणार असल्याने स्ट्रॉबेरीचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.