Raigad Rain Update| मुंबईसह रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग भागात मुसळधार पाऊस झाल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. किल्ले रायगडावर ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. त्यानंतर आता येथील एक धडकी भरवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ढगफुटी झाल्यामुळे अनेक नद्या तुडुंब भरून वाहताना दिसत आहेत. रायगड किल्ल्याला धबधब्याचे स्वरूप आल्याचे पाहायला मिळत आहे. येथून पर्यटकांना वाट काढणे देखील अवघड झाल्याचे दिसते.
व्हायरल व्हिडीओमध्ये किल्ल्याच्या पायऱ्यांवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहताना दिसत आहे. त्यात काही पर्यटकसुद्धा अडकल्याचं दिसून येत आहे. पर्यटक आणि शिवप्रेमी हे तारेवरची कसरत करत त्या वाहत्या पाण्यातून वाट काढण्याचा प्रयत्न करत आहे. हे पर्यटक पावसाच्या कचाट्यातून सुखरुप बाहेर पडले आहेत. Raigad Rain Update|
रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद
या घटनेच्या पार्श्वभूमीवर किल्ले रायगडावर जाणाऱ्या वाटा बंद केल्या आहेत. मुसळधार पावसात गडकिल्ल्यांवर चढण्याचं धाडस करू नये, असं आवाहनही सध्या करण्यात येत आहे. आजपासून अर्थात 8 जुलैपासून रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच रायगड किल्ल्यावर जाणारा रोप वे आणि पायरी मार्ग बंद करण्यात आला आहे.
तर किल्ल्यावर पायी जाणाऱ्या चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजा मार्गावर बॅरीकेटिंग करण्यात आली आहे. रविवारी संध्याकाळी रायगडावर निर्माण झालेल्या ढगफुटी सदृष्य परिस्थितीनंतर जिल्हा प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे. Raigad Rain Update|
दरम्यान, रागयड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यात सरासरी 77 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने आज येथे अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
हेही वाचा: