लालमातीतील धुरळा… महाराष्ट्र केसरी

भारतीय कुस्ती क्षेत्रातील एक अत्यंत मानाची समजली जाणारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नुकतीच पार पडली. यावेळी स्पर्धेला नवा विजेता मिळाला. पारंपरिक मल्ल ज्या मुशीतून तयार होतात त्याला फाटा देत ग्रीकोरोमन गटातून आलेला आणि स्पर्धेपूर्वी फारसा चर्चेत नसलेल्या हर्षवर्धन सदगीरने सगळ्यांनाच आश्‍चर्याचा धक्‍का देत किताब व मानाची गदा पटकावली.

कोणतेही रत्न निरखण्यासाठी एका रत्नपारख्याची गरज असते, आणि काका पवार हे केवळ एक नाव नसून किंवा रत्नपारखी कर्तृत्व नसून ती एक देशाची कुस्ती संस्कृती आहे. दूरदृष्टी कशाला म्हणतात त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे काका पवार. आपल्या तालमीत आलेला धोंडा लख्ख करुन वरच्या स्तरावर घेऊन जाण्याचे कार्य कित्येक वर्षे करत असलेले काका पवार आपल्याच दोन शिष्यांतील रंगलेला हा सामना पाहताना गहिवरले होते. कोणीही जिंकले तरी खरा विजय काका पवारांचाच होणार होता. आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात काकांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणारा सदगीर आणि शैलेश शेळके यांनी गेल्या मोसमापासूनच विविध स्पर्धा गाजवायला सुरुवात केली होती, मात्र यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्तीत हेच दोघे अंतिम लढत खेळतील याची कोणालाही शाश्‍वती नव्हती, म्हणूनच हर्षवर्धनचे यश अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. दोन चांगले मित्र चांगले स्पर्धक बनल्याचे या स्पर्धेत पाहायला मिळाले. विजेतेपदानंतर हर्षवर्धनने शैलेशला खांद्यावर उचलून घेत आनंद साजरा केला हा क्षण केवळ कुस्तीतच नव्हे तर सगळ्याच क्रीडा प्रकारातील खेळाडूंसाठी प्रेरणा देणारा होता. विजयात सगळ्यांना सहभागी करुन घेण्याचा दृष्टीकोन हर्षवर्धनने सिद्ध केला तर पराभवातही मित्राचा म्हणजे आपलाच विजय मानणारा शैलेश सगळ्यांचीच मने जिंकून गेला.

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद व अमानोरा प्रायोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला यंदा प्रचंड प्रतिसाद लाभला होता, मात्र मानांकित मल्ल हरल्याने अंतिम लढत पाहण्यासाठी असलेला जोश दिसला नाही. तरीही कुस्तीने अन्य क्रीडा प्रकाराच्याच नव्हे तर चक्‍क क्रिकेटपेक्षाही जास्त प्रसिद्धी मिळविली. मुख्य बातम्यांत स्थान मिळवून यंदाच्या या स्पर्धेने पुणेकरांच्या मनावर गारुड केले. गादी विभागात (मॅट) झालेली या स्पर्धेची अंतिम लढत हर्षवर्धनने 3-1 अशा गुणांनी जिंकली. या लढतीत शैलेशने अखेरच्या काही सेकंदात एकेरी पट काढण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली मात्र त्याला अपयश आले आणि त्यावेळी अखेरच्या बारा सेकंदात हर्षवर्धनने एकेरी पट काढला व केवळ एका गुणाच्या फरकाने हा सामना जिंकताना प्रथमच महाराष्ट्र केसरी किताबाचा व मानाच्या गदेचा मान मिळविला. या लढतीत सुरुवातीला हर्षवर्धनने नकारात्मक खेळ करायला सुरुवात केली होती, मात्र पंचांनी ताकीद दिल्यानंतर त्याने गांभीर्य दाखविले. या अंतिम लढतीत 30 सेकंदाचा ब्रेक झाला त्यावेळी दोन्ही मल्ल 1-1 अशा बरोबरीवर होते, मात्र त्यानंतर शैलेशला एकेरी पट काढण्यात अपयश आले व हर्षवर्धनने अखेरच्या काही सेकंदात एकेरी पट काढला व किताबाचा मान मिळविला.

हर्षवर्धन जरी मूळचा नाशिकचा असला तरी त्याने काकांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे डावपेच गिरविले. अर्थात यात त्याचे मूळ प्रशिक्षक गोरखनाथ बलकवडे यांचेही योगदान मोलाचे आहे. लढत जिंकल्यावर हर्षवर्धनने त्याचक्षणी बलकवडे यांच्याशी संपर्क करून आशीर्वाद घेतले. अभिजीत कटके, बाला रफिक, सागर बिराजदार, माऊली जमदाडे हे अव्वल मल्ल या स्पर्धेतून अपयशी होत बाहेर पडले त्यामुळे हर्षवर्धनचा विजय सगळ्यांसाठीच अविश्‍वसनिय होता. गेली जवळपास दोन वर्षे हर्षवर्धन काका पवारांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. 90 आणि 92 किलो वजनी गटाचा सराव व्हावा हा त्यामागचा उद्देश होता.

गेली दहा वर्षे काका पवार आपल्याच तालमीतील मल्लाने मानाची स्पर्धा जिंकावी यासाठी मेहनत घेत होते, मात्र यंदा हर्षवर्धनच्या रुपाने त्यांचे व त्यांच्या तालमीचे स्वप्न पूर्ण झाले. ही स्पर्धा जिंकल्यामुळे आता हर्षवर्धनने देशाची सर्वोच्च मानाची असलेली हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा देखील लढवावी व त्याची मानाची गदाही मिळवावी अशी अपेक्षा आता काका पवार निश्‍चितच करत असतील. त्याच बरोबर येत्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेल्या विविध कुस्ती स्पर्धांमध्येही यश मिळविण्यासाठी हर्षवर्धन तयारी करेल व त्यात यशस्वीही होईल असा विश्‍वास काका पवार व्यक्त करतात, त्यातच हर्षवर्धनचा दर्जा सिद्ध होतो. काका पवारांच्या अनेक मल्लांनी यापूर्वीही या स्पर्धेत भाग घेतला आहे, मात्र अनेकदा पंचांच्या चुकीच्या निर्णयांचा त्यांना फटका बसला होता. मात्र त्यांनी पुर्ण सकारात्मकतेने प्रत्येक वेळी या स्पर्धेत आपले मल्ल उतरविले होते, अखेर एका दशकानंतर त्यांच्या तालमीच्या हर्षवर्धनने काकांचे ही गदा मिळविण्याचे स्वप्न पूर्ण केले व आपल्या सगळ्या गुरुंना थाटात गुरुदक्षिणा दिली.

हर्षवर्धनचा आजपर्यंतचा प्रवासही थक्‍क करणारा आहे. कोंभाळणे गावात जन्माला आलेल्या हर्षवर्धनने वयाच्या अकराव्या वर्षी बलकवडे यांच्या व्यायामशाळेत जाण्यास सुरुवात केली. पुढे तो भारतीय लष्करातही सामिल झाला मात्र कुस्तीवरील प्रेम स्वस्थ बसू देईनात म्हणून तो पुन्हा एकदा आखाड्यात उतरला. बलकवडे यांनी स्वत: जवळपास दोन दशके ही मानाची गदा मिळविण्यासाठी कठोर मेहनत घेतली मात्र त्यांना त्यात यश आले नाही. त्यांचे हे स्वप्न त्यांचा पठ्ठ्या हर्षवर्धनने पूर्ण केले. आता येत्या काळात हर्षवर्धनने केवळ राज्य, राष्ट्रीय पातळीवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही यश मिळवावे.

जपान, इराण, अफगाणिस्तान, रशिया या देशांचे जागतिक कुस्ती क्षेत्रावर वर्चस्व आहे, ते मोडून काढण्याची कामगिरी हर्षवर्धनने करावी अशी काका पवारांचीच नव्हे तर सगळ्या कुस्ती शौकीनांची अपेक्षा आहे. हर्षवर्धननेच केसरी किताब मिळविल्याने त्याच्यावर आता या अपेक्षा पूर्ण करण्याचे दडपण आहे. मात्र याच दडपणाचे रुपांतर तो यशामध्ये करेल असा विश्‍वासही त्याने निर्माण केला आहे.
———–
मानाच्या गदेचा इतिहास
सहकारमहर्षी मामासाहेब मोहोळ यांनी 65 वर्षांपुर्वी ही स्पर्धा सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाने 1982 पासून ही मानाची गदा मोहोळ यांच्या स्मृतीनिमित्ताने देण्यास सुरुवात केली. खरेतर त्यापूर्वी 1953 पासून 1982 पर्यंत ही गदा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून दिली जात होती. त्यानंतर मोहोळ कुटुंबीयांनी पुढाकार घेत ही गदा देण्याची परंपरा निर्माण केली ती आज तीन दशाकांपेक्षाही जास्त वर्षे सुरू आहे. बारा किलो वजनाच्या चांदीचे पत्रे लाकडावर कोरुन तयार करण्यात येणारी ही गदा साधारण अडीच फूट लांबीची असते. गदेवर एका बाजूला मोहोळ यांचे चित्र तर दुसरीकडील बाजूवर हनुमानाचे चित्र कोरलेले असते. ही मानाची गदा जिंकणारा हर्षवर्धन 44 वा महाराष्ट्र केसरी ठरला आहे.

प्रथमच डोपींग टेस्ट
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत देखील उत्तेजक द्रव्य सेवन विरोधी चाचणी घेण्यात यावी अशी मागणी गेली कित्येक वर्षे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद करत होती. यावेळी मात्र परिषदेच्या प्रयत्नांना यश आले व यंदा प्रथमच ही चाचणी घेण्यात आली. देशात तसेच परदेशातील अनेक क्रीडापटूंवर या चाचणीत दोषी आढळल्याने कारवाई झालेली आहे, त्यामुळे कुस्तीत देखील अशी चाचणी व्हावी व खेळाडूंनी कोणताही गैरप्रकार न करता खेळ करावा यासाठी परिषद प्रयत्नशील होती व आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या काही मल्लांची राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य सेवन विरोधी समितीने (नाडा) चाचणी घेतली. त्याचा अहवाल येत्या काही दिवसांत परिषदेकडून जाहीर केला जाणार आहे. संपुर्ण क्रीडा क्षेत्राला सध्या उत्तेजक द्रव्य सेवनाचा विळखा बसला आहे. अनेक खेळाडू त्यात गोवले गेल्याचेही जाहीर झाले आहे मात्र हीच वाळवी कुस्तीमध्ये येऊ नये यासाठी परिषद खूप काळ वाट पाहत होती, अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. खेळाडू कोणीही असो त्याने उत्तेजकांचा आधार घेत नव्हे तर स्वत:च्या गुणवत्तेचा आधार घेत सामना खेळावा तसेच यश मिळवावे व क्रीडा क्षेत्रातील ही वाळवी दूर करावी यासाठी विविध क्रीडा संघटनांप्रमाणेच परिषदेनेही खूप मेहनत घेतली आहे, याच मेहनतीमुळे खरी गुणवत्ता प्रकाशात येईल याची खात्री आहे.

अमित डोंगरे

Leave A Reply

Your email address will not be published.