मार्केट यार्डात हिमाचलप्रदेश येथून आवक सुरू
पुणे – रंगाने लाल-गुलाबी आकाराने लहान आणि चवीला गोड असणाऱ्या “चेरी’ या फळाचा हंगाम सुरू झाला आहे. मार्केट यार्डातील फळबाजारात हिमाचल प्रदेश येथून चेरीची आवक सुरू झाली आहे. चेरी या फळाला चांगली मागणी असून चेरीच्या दर्जानुसार प्रतिकिलोस 200 पासून 250 रुपयांपर्यत भाव मिळत आहे.
“रविवारी मार्केटयार्ड येथील फळबाजारात हिमाचल प्रदेशमधील फागू भागातून चेरीच्या सुमारे 450 बॉक्सची आवक झाली. एक बॉक्स हा एक किलोचा असून दर्जानुसार चेरीला प्रतिकिलोस 200 रुपयांपासून 250 रुपयांपर्यंत भाव मिळत असून सध्या पहिलीच आवक झाली आहे,’ अशी माहिती चेरीचे व्यापारी करण जाधव यांनी दिली.
“मिशरी’ आणि “मखमली’ या दोन प्रमुख जातींमध्ये चेरी उपलब्ध असून सध्या “मिशरी’ जातीच्या चेरींची आवक होत आहे. “मिशरी’ चेरी ही चवीला आंबटगोड असून ती साधारण दोन दिवस टिकते. तर, चवीला गोड असलेली “मखमली’ चेरी दोन दिवस टिकते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी हवामान चेरीसाठी पोषक असल्याने भावही आटोक्यात आले आहे. चेरीला घरगुती ग्राहक आणि स्टॉलविक्रेते यांच्याकडून चांगली मागणी आहे. चेरीचा हंगाम आणखी 15 ते 20 दिवस सुरू राहिल. मात्र, पावसाला सुरवात झाली, तर तो लवकर संपेल येईल. गेल्या वर्षीच्या तुलनेत सुरुवातीलाच चांगल्या प्रमाणात आवक होत असल्याने भावही आवाक्यात आहेत. काश्मीर चेरी हंगाम सुरू होण्यास महिनाभर कालावधी लागेल. तो हंगाम जुलैपर्यंत चालेल, असेही जाधव यांनी सांगितले.