Narendra Modi : अनुसूचित जाती, जमाती, दलित आणि आदिवासींच्या एकजुटीमुळे काँग्रेस गेल्या अनेक वर्षांपासून आपला आधार गमावत आहे. संविधानाच्या नावावर केवळ लाल पुस्तक छापणे आणि त्यात संविधानाचा एक शब्दही न लिहिणे हा संविधान संपवण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
नांदेडमधील महायुतीच्या सभेत बोलताना त्यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसला देशात बाबासाहेब आंबेडकरांचे नाही तर स्वत:चं संविधान लागू करायचे आहे. तसेच काँग्रेस जाती जातीत भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करते आहे, असा आरोपही त्यांनी केला.
नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेसचे लोक संविधानाच्या नावावर लाल पुस्तकांचे वाटप करत आहेत. त्यावर भारताचे संविधान असे लिहिले आहे. मात्र, त्या पुस्तकाची पाने कोरी आहेत. निवडणुकीच्या प्रचारात खोट्या गोष्टी पसरवण्याचे काम काँग्रेस पक्ष करतो आहे. काँग्रेसचे लोक कलम 370 वर इतके प्रेम का करतात, असा सवाल मोदींनी विरोधी पक्षाने काश्मीरमध्ये कलम 370 बहाल करण्याच्या मागणीचा संदर्भ देत विचारला.
भारतीय संविधान नावाच्या लाल पुस्तकात कोरी पाने आहेत. हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काँग्रेसच्या अवहेलना आणि द्वेषाचा पुरावा आहे, असे ते म्हणाले. काँग्रेसच्या या राजकीय खेळामुळे संपूर्ण देश हादरला आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीच्या समर्थनाची लाट आहे, असे मोदी म्हणाले.
काँग्रेसला देशात बाबासाहेब आंबेडकरांचे नाही तर स्वत:चे संविधान लागू करायचे आहे. हाच प्रयत्न त्यांनी आणीबाणीच्या काळात केला होता. काँग्रेसच्या मनात आंबेडकरांप्रती द्वेष आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान काँग्रेसने काश्मीरमध्ये लागू होऊ दिले नाही.
तिथे कलम ३७० द्वारे वेगळा कायदा लागू केला. त्यांनी तेथील दलितांना कोणतेही अधिकार दिले नाहीत, आज हेच लोक दलितांच्या हक्काच्या आणि संविधान रक्षणाच्या गोष्टी करत आहेत, असेही ते म्हणाले.