पुणे – सेंट्रल बँकेद्वारा ‘सेंट सुरक्षित समृद्धी’ या जीवन विमा कव्हरसह आवर्ती जमा योजनेची सुरुवात करण्यात आली. ही माहिती सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे पुणे विभाग प्रमुख बी बी मुटेरजा यांनी पत्रकार परिषदेत दिली आणि या योजनेची वैशिष्ट्ये सांगितली.
या योजनेचा लाभ १८ ते ५० वर्ष वयोगटातील नागरिकांना घेता येणार आहे. या आवर्ती जमा योजनेच्या पूर्ततेपर्यंत मूळ हप्त्याच्या रकमेच्या १०० पटीने जीवन विमा कव्हरेज मिळणार आहे. ‘सेंट सुरक्षित समृद्धी’ योजना ८४ महिन्यांची असेल व किमान हप्ता दहा हजार रुपये आणि त्यानंतर त्या पटीत असणार आहे.
जास्तीत जास्त हप्त्याची रक्कम एक लाख रुपयांपर्यंत असेल. जमा कर्त्याच्या जीवन विमा कव्हरेजचे प्रिमियम सेंट्रल बँक देणार आहे. वेळेअगोदर ही योजना बंद केली तर पेनाल्टी लागणार आहे. ही योजना सुरू झाल्यानंतर सहा महिन्यानंतर कर्ज उपलब्ध होणार आहे. जर संबंधित ग्राहकाचा मृत्यू झाला तर त्याला जीवन विमा कव्हरेज रक्कम अधिक आवर्ती जमा रक्कम काही नियम आणि अटीच्या अधीन राहून मिळणार आहे.
या योजनेमध्ये गुंतवणूक केलेल्या ग्राहकाला ८४ महिन्यानंतर मूळ हप्त्याच्या १०० पट रक्कम मिळणार आहे. त्याचबरोबर जीवन विमा कव्हरेज मूळ हप्त्याच्या १०० पट असणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घेण्याची गरज असल्याचे मत सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे पुणे विभाग प्रमुख बी बी मुटरेजा यांनी व्यक्त केले.