खासगी शाळांमधील शिक्षक भरती डिसेंबरमध्ये

पुणे – राज्यातील विविध ठिकाणच्या खासगी शाळांमधील मुलाखतीद्वारे होणारी शिक्षक भरती आता डिसेंबरमध्ये सुरू करण्यात येणार आहे. यामुळे उमेदवारांना आणखी एका महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

राज्य शासनाने “पवित्र पोर्टल’मार्फत शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केलेली आहे. 12 हजार शिक्षकांची भरती करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. यासाठी 87 हजार उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे या भरती प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले होते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये मुलाखतीशिवाय शिक्षक भरती करण्याबाबत उमेदवारांची निवड याची जाहीर करण्यात आलेली आहे. यात 5 हजार 822 उमेदवारांचा समावेश करण्यात आला होता. या उमेदवारांना कागदपत्रांची पडताळणी करून शाळांमधील नियुक्‍तीपत्रे देण्यात आलेली आहेत.

निवड यादीत संधी न मिळालेल्या उमेदवारांनी दाखल केलेल्या तक्रार अर्जांवर नोव्हेंबरमध्ये निर्णय घेण्यात येणार आहे. यातील पात्र उमेदवारांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी शिक्षण आयुक्‍त विशाल सोळंकी यांनी पुढाकार घेतलेला आहे. मुलाखतीसह होणारी शिक्षक भरतीची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत जोरदार हालचाली सुरू झालेल्या आहेत. या प्रक्रियेनंतर खासगी शाळांमधील शिक्षक भरतीची प्रक्रिया तत्काळ सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण आयुक्तांनी दिली आहे.

सूचना व वेळापत्रक लवकरच “पवित्र पोर्टल’वर
शिक्षक भरतीकडे आस लावून बसलेले उमेदवार विविध प्रकारची माहिती विचारण्यासाठी शिक्षण आयुक्त कार्यालयात धाव घेऊ लागले आहेत. शिक्षक भरतीबाबतच्या सर्व सूचना व वेळापत्रक “पवित्र पोर्टल’वर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी विनाकारण शिक्षण आयुुक्त कार्यालयात गर्दी करू नये, अशा सूचना अधिकाऱ्यांकडून उमेदवारांना देण्यात आलेल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.