‘पवित्र’ शिक्षक भरती मार्चअखेर करणार

शिक्षण आयुक्‍त : 800 रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा

पुणे – राज्य शासनाच्या वतीने पवित्र पोर्टलद्वारे राबविण्यात येत असलेली शिक्षक भरतीची सर्व प्रक्रिया मार्च अखेर पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिली आहे.

मागील एक-दीड वर्षांपासून टप्प्याटप्प्याने शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू आहे. पोर्टलवरील तांत्रिक अडचणी, न्यायालयीन प्रकरणे यामुळे भरतीत सतत अडसर येत होता. त्यातून मार्ग काढत प्रक्रिया राबवण्यात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व खासगी संस्थांच्या शाळांमधील मुलाखतीशिवायची भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे.

आता इयत्ता नववी ते बारावी या गटातील खासगी संस्थांमधील 800 रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी उमेदवारांकडून प्राधान्यक्रम नोंदवण्याची प्रक्रिया गेल्या महिन्यात पूर्ण करण्यात आलेली आहे. यातील उमेदवारांची निवड यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर मार्चमध्ये माजी सैनिकांच्या 1 हजार 200 पदे भरण्याची प्रक्रियाही पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. खासगी संस्थांमधील 3 हजार शिक्षकांची पदे भरण्यासाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहे. एका जागेसाठी दहा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवावे लागणार आहे. गुणवत्तेनुसारच उमेदवाराची निवड करण्याचे बंधनही घालण्यात आलेले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.