पुणे – जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गाच्या 714 रिक्त पदे सरळसेवेने भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यापैकी 10 टक्के म्हणजेच 74 पदे ग्रामपंचायत कर्मचारी सेवाज्येष्ठता यादीतून शैक्षणिक निकषानुसार भरणार आहेत. त्या कर्मचाऱ्यांची अंतिम सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली आहे. संबंधित पात्र कर्मचाऱ्यांनी 10 फेब्रुवारीपर्यंत विस्तार अधिकाऱ्यांकडे काही आक्षेप असल्यास कागदपत्रांसह नोंदविण्याच्या सूचना ग्रामपंचायत विभागाने दिल्या आहेत.
जिल्हा परिषदेकडे 714 जागांसाठी पद भरती सुरू आहे. त्या दरम्यान, 10 टक्के ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध झाली आहे. यादीतील संबंधित ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून त्यांची पोहोच तालुकास्तरावर दफ्तरी ठेवण्याच्या गटविकास अधिकाऱ्यांना (बीडीओ) सूचना दिल्या. यादीत नाव असल्याची खात्री करून घ्यावी. मात्र, त्यात काही दुरुस्ती असल्यास ते निदर्शनास आणून देताना त्याबाबतची संबंधित कर्मचाऱ्यांनी आवश्यक ते कागदपत्रे पुरावे जोडावे. तसेच, स्वतःच्या अभियाप्रायासह माहिती भरून प्रमाणपत्रासह 10 फेब्रुवारीपर्यंत पंचायतच्या विस्तार अधिकाऱ्यांमार्फत जिल्हा परिषदेत जमा करण्याचे आदेश ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी दिले.
कर्मचाऱ्यांची माहिती पंचायत समिती स्तरावर पडताळणी करून ती बरोबर असल्याची खात्री करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या ज्येष्ठता यादीतील पूर्ण माहितीबाबत भविष्यात कोणतीही तक्रार आक्षेप आल्यास त्याची जबाबदारी पंचायत समितीची राहणार आहे.