पुणे – करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने देशभरात हजारो बोगींचे (कोचेस) रुपांतर विलगीकरण कक्षात केले. पुणे विभागामध्येही 60 बोगी तयार केल्या. यासाठी रेल्वेकडून कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुणे विभागाने कोचेसच्या अनुषंगाने पूर्वतयारी सुरू झाली आहे.
यासाठी 30 डॉक्टर्स, 90 नर्सेससह हॉस्पिटल अटेंडंटस, ओटी असिस्टंटस आदी निमवैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. 90 दिवसांच्या करारावर सुमारे 250 जागांसाठी ही नियुक्ती करण्यात येणार आहे.
रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार कोचेस तयार केले आहेत. राज्य प्रशासनाच्या सूचना आल्यानंतरच त्यामधील काम सुरू करण्यात येणार आहे, असे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी सांगितले.