गुन्हे शाखेच्या कारवाई पथकालाही रोखण्याचे “धाडस’
राज्य उत्पादनच्या अधिकाऱ्यांना जागेवरच हप्ता जात असल्याची चर्चा
पोलीस आयुक्त, अधिकाऱ्यांचे निर्देश मात्र धाब्यावरच
संजय कडू
पुणे – येरवडा पोलीस ठाण्यातील अवैध धंद्यांना अभय देणारे पोलीस कर्मचारी अक्षरशः निगरगट्ट बनले आहेत. गुन्हे शाखेचे पथक कारवाईला आले, की त्यांनाच दमदाटी करुन रोखले जात आहे. मागील 20 वर्षे येरवडा पोलीस ठाण्यात ठाण मांडणाऱ्या “वसुली पंटर’ची मजल आता गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना रोखण्यापर्यंत गेली आहे. यावर परिमंडळाचे पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मौन बाळगल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
शहरातील पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांवर पोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली छापे टाकण्याचे निर्देश दिले गेले आहेत. पण, “येरवडा’सारखी पोलीस ठाणे हे निर्देश धाब्यावर बसवत आहेत. यावर मध्यंतरी इतर परिमंडळांतील पोलीस उपायुक्तांच्या अधिपत्याखाली पथक तयार करुन येरवडा परिसरातील अवैध दारू धंद्यांवर छापेमारी करण्यात आली. यामध्ये पावणेतीन लाख रुपयांची गावठी 784 लिटर दारू, 1,400 लिटर रसायन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. यानंतरही पोलीस आयुक्तालयातून वारंवार आदेश देऊनही येथील दारू आणि इतर अवैध धंद्यांना आळा बसलेला नाही.
येरवडा परिसरात गांजा, दारू, पत्त्यांचे क्लब असे धंदे सर्रास सुरू आहेत. येथे काही वस्त्या अशा आहेत, की तेथे घराघरात दारू गाळली जाते. महिला दारू गाळतात आणि पुरुष त्याची विक्री करतात. राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि स्थानिक पोलीस ठाण्याच्या मिलिभगतीमुळे हे धंदे राजरोसपणे सुरू असल्याचे स्थानिक कार्यकर्ते सांगतात. या अवैध धंदेवाल्यांना थेट पोलिसांचे “अभय’ आहे.
एकट्या अवैध दारू विक्रीच्या धंद्यातून “वसुली’ वाला कर्मचारी दरमहिना 60 ते 70 लाख रुपये “कलेक्शन’ करत आहे. यातील काही रक्कम वरिष्ठांना पोहचवून उर्वरित रक्कम वसुलीवाला लाटत आहे. एकावेळी त्याच्या खिशात तीन ते चार लाख रुपये सहज सापडू शकतात. यावरुनच त्याच्या “कलेक्शन’चा अंदाज येऊ शकतो. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांकडून उत्पादन शुल्क विभागालाही धंद्याच्या जागेवर फिरकू दिले जात नाही.
त्यांचा वाटा जागेवरच पोहचवला जात असल्याची माहिती पोलीस ठाण्यातीलच सूत्रांनी दिली. तसेच दारू गाळणाऱ्यांनी हप्ते न दिल्यास त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली जाते. यासंदर्भात अनेक महिलांनीदेखील आक्षेप घेत आयुक्तालयापर्यंत दार ठोठावले आहे. मात्र, त्याचा काहीही फरक पडलेला नाही.
…मग येरवडा पोलीस गप्प का?
झोन-3 पोलीस उपायुक्तांनी त्यांच्या हद्दीत शुक्रवारी रात्री बेकायदा दारू अड्ड्यावर छापा टाकला. यातील चौकशीत संबंधित अड्डा चालवणारे आणि त्याला कच्चा माल पुरवणारे येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आरोपींना जेरबंद करण्यात आले. हे आरोपी येरवडा हद्दीतही अड्डा चालवत असल्याची माहिती आहे. पण, त्यांच्यावर कारवाईसाठी हात मात्र हप्त्यांच्या ओझ्याखाली दाबले गेले आहेत.