fbpx

लघुउद्योगांची वसुली वाढली! सरकारी विभागांनी 13,401 कोटी रुपये दिले

नवी दिल्ली- लघुउद्योगांकडून घेतलेल्या वस्तूची देणी त्यांना वेळेवर मिळावी याकरिता लघुउद्योग मंत्रालयाने सहा महिन्यांत केलेल्या प्रयत्नांना यश मिळू लागले आहेत.

सरकारी विभागांनी लघुउद्योगांची देणी देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या पाच महिन्यांत सरकारी विभागांनी लघुउद्योगांची 13,401 कोटी रुपयांची देणी दिली. सप्टेंबर महिन्यामध्ये सरकारी विभागांनी लघुउद्योगांचे 3,700 कोटी रुपये चुकते केले आहेत.

लघुउद्योग मंत्रालयाने देशातील 2,800 मोठ्या कंपन्यांना पत्र पाठवून लघुउद्योगाची देणी शक्‍य तितक्‍या लवकर चुकती करावीत, असे सांगितले आहे. लघुउद्योग व्याजावर कर्ज घेऊन वस्तूचे उत्पादन करतात. या वस्तूचे उत्पादन केल्यानंतर त्यांची येणी वसूल होत नाहीत. त्यामुळे त्यांना कर्जाचा भार सहन करावा लागतो. ही बाब ध्यानात आल्यानंतर लघुउद्योग मंत्रालयाने केंद्र आणि राज्यांच्या विभागाबरोबरच खासगी कंपन्यांना लघुउद्योगाची देणी लवकर चुकती करावीत, असे सांगितले आहे.

लघुउद्योग मंत्रालयाने कंपन्यांना आणि सरकारी विभागांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, जर त्यांची देणी लवकर चुकती केली तर त्यांचे खेळते भांडवल वाढते. त्यांना नवीन ऑर्डर घेऊन मालाचा पुरवठा करता येतो. आता दिवाळीचा सण येत असल्यामुळे लघुउद्योगांना खेळत्या भांडवलाची जास्त गरज आहे.

लघुउद्योग कायद्यात दुरुस्ती

लघु उद्योगांची बिले लवकर मिळावीत, याकरिता लघुउद्योग विकास कायदा 2006 मध्ये आवश्‍यक ती दुरुस्ती करण्यात आली आहे. या दुरुस्तीनुसार लघुउद्योगाची देणी 45 दिवसांच्या आत चुकती करणे गरजेचे आहे. याकडेही लघुउद्योग मंत्रालयाने कंपन्यांचे आणि सरकारी विभागांची लक्ष वेधले आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.