शिक्षण संस्थांकडून वसतिगृह, वाहतूक शुल्काची वसुली

"एआयसीटीई'कडून दखल : अनेक सुविधांच्या नावाखाली शुल्क आकारण्यास बसणार पायबंद

 

  • वापर होत नसलेल्या सुविधांच्या शुल्काची आकारणी न करण्याच्या सूचना
  • उल्लंघन करणाऱ्या शैक्षणिक संस्थांवर होणार कारवाई

पुणे – अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) ऑनलाइन शिक्षणात विद्यार्थ्यांकडून वापर होत नसलेल्या सुविधांच्या शुल्काची आकारणी करू नये, असे स्पष्ट निर्देश तंत्रशिक्षण संस्थांना दिले आहेत. एवढेच नव्हे, तर त्याचे उल्लंघन करणाऱ्या शैक्षणिक संस्थांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे “एआयसीटीई’ म्हटले आहे.

करोना काळात महाविद्यालये बंद असतानाही शिक्षण संस्थांकडून वसतिगृह आणि वाहतूक शुल्क आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी पालक आणि विद्यार्थ्यांकडून “एआयसीटीई’कडे करण्यात आल्या. या तक्रारींची दखल घेऊन “एआयसीटीई’चे सदस्य सचिव राजीवकुमार यांनी परिपत्रकाद्वारे संलग्न शिक्षण संस्थांना शुल्काबाबतचे निर्देश दिले.

करोना संसर्गामुळे विद्यार्थ्यांकडून वसतिगृह आणि वाहतूक सुविधा वापर सुरू नाही. त्यामुळे शिक्षण संस्था केवळ खानावळ आणि वाहतूक देखभालीसाठीचे शुल्क आकारू शकतात. विद्यार्थ्यांकडून ज्या सुविधांचा वापर होत आहे, त्यांचे वाजवी शुल्क आकारावे. तर ज्या सुविधांचा वापर विद्यार्थी करू शकत नाही त्यांचे शुल्क आकारता येणार नाही, असे परिपत्रकात नमूद केले आहे.

दरम्यान, करोना काळात सुविधांचा वापर नसताना शुल्क आकारल्याचे निदर्शनास आले आहे. अशा परिस्थितीत संस्थांनी शुल्क आकारले असल्यास, अशा संस्थांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे “एआयसीटीई’ने स्पष्ट केले आहे. त्यामुळे तंत्रशिक्षण संस्थांना आता विद्यार्थ्यांकडून अनेक सुविधांच्या नावाखाली शुल्क घेण्यास पायबंद बसणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.