पुणे – बेशिस्त रिक्षाचालक रडारवर; 47 लाख रुपयांचा दंड वसूल

पुणे – शहरातील रिक्षाचालकांवर कारवाई करण्याचा बडगा प्रादेशिक परिवहन कार्यालयाने उगारला आहे. गेल्या वर्षभरामध्ये करण्यात आलेल्या कारवाईमध्ये कार्यालयाने तब्बल 46 लाख 89 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर, 220 रिक्षाचालकांचे परवानेदेखील निलंबित करण्यात आले आहेत.

हेल्मेट न वापरणे, सिग्नल न पाळणे, सीटबेल्ट न लावणे आदी वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांवर विविध परिसरामध्ये कारवाई करण्यात येते. यातून रिक्षाचालकांचीदेखील सुटका झालेली नाही.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पुणे विभागाकडून नियमभंग करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. जादा प्रवासी घेणे, जादा भाडे आकारणे, भाडे नाकारणे, उद्धट वर्तन आदी गोष्टींबाबत रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात येते.
प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी-चिंचवड, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बारामती, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अकलूज या कार्यालयांतर्गत वर्षभरात सुमारे 2 हजार 805 रिक्षांची वर्षभरात तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 1 हजार 706 रिक्षा दोषी आढळल्या आहेत. गेल्या वर्षभरामध्ये तब्बल 220 रिक्षाचालकांचे परवाने निलंबित केले आहेत.

नियमभंग करणाऱ्या रिक्षाचालकांना हा मोठा दणकाच असून रिक्षाचालकांनी नियमांचे उल्लंघन न करता पालन करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

येथे करता येते तक्रार
रिक्षाचालकांनी भाडे नाकारल्यास प्रवाशांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा. आरटीओ अधिकाऱ्यांकडे याबाबत लेखी, ईमेलसह अथवा टोल फ्री क्रमांकावर (1800-233-0012) रिक्षाचालकांबाबत तक्रार करण्याचे आवाहन आरटीओकडून करण्यात आले.

रिक्षाचालकांवर कारवाई
कारण रिक्षांची संख्या
1. जादा भाडे आकारणे – 60
2. मीटर फास्ट – -07
3. भाडे नाकारणे – 142
4. जादा प्रवासी घेणे – 343
5. उद्धट वर्तन – 66

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे रिक्षाचालकांच्या अनेक तक्रारी येत आहेत. रिक्षाचालकांनी नियमांचे पालन न केल्यास कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे. कारवाई टाळण्यासाठी अधिकाधिक रिक्षाचालकांनी नियमांचे पालन करणे आवश्‍यक आहे.
– विनोद सगरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here