पोलीस आयुक्तांकडे तक्रार; कारवाईकडे नागरिकांचे लक्ष
पिंपरी – पोलीस ठाणे, गुन्हे शाखा आणि वाहतूक विभागात सध्या झिरो पोलीस अथवा पोलीस मित्र या गोंडस नावाखाली काहीजण कार्यरत आहेत. त्यापैकी काही जणांकडे पोलिसांचा शिक्का असलेली ओळखपत्रही आहेत. आता या पोलीस मित्र अथवा झिरो पोलिसांचा वापर वसुली एजंट म्हणून केला जात असल्याची तक्रार पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
तात्कालीन पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी “पोलीस मित्र’ ही संकल्पना साकारली. पोलिसांना कारवाई करताना युवकांची मदत व्हावी हा या योजनेमागचा मुख्य उद्देश होता. मात्र आता पोलीस मित्र अथवा झिरो पोलिसांच्या नावाखाली गुन्हेगारीत सक्रिय असलेल्या युवकांना पोलीस हाताशी धरत आहेत. त्यांचा वापर वसुलीचे काम करण्यासाठी केला जात आहे.
त्यातूनच अनेक युवकांना वसुलीसाठी पोलीस मित्र बनण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. आपल्यालाही ओळखपत्र आणि पोलिसांचे अभय मिळावे यासाठी अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे युवक अधिकाऱ्यांशी सेटींग करतात. हॉटेल, ढाबा, मसाज पार्लर, भंगार दुकानवाले, गुटखा विकणारे पान टपरीवाले यांच्याकडून हेच पोलीस मित्र वसुली करताना दिसत आहेत.
झिरो पोलिसांचे कारनामे
सांगवी पोलीस ठाण्यातील एका झिरो पोलिसाबाबत पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. केंद्रीय कर्मचारी असलेला तो झिरो पोलीस कोणाकडून किती वसुली करतो, याची सविस्तर माहिती पोलीस आयुक्तांना निवेदनाद्वारे दिली आहे. त्या झिरो पोलिसाची पत्नी पोलीस दलात आहे. वाकड पोलीस ठाण्यातील एका झिरो पोलिसाने तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेला आमीष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. तर पिंपरीतील एका झिरो पोलिसाने हातगाडीवाल्यावर कारवाई करताना त्याच्या गल्ल्यातील रक्कम हातोहात लांबविल्याचेही उघडकीस आले होते. मात्र ही सर्व प्रकरणे दाबण्यात आली आहेत.