वसुली करा; अन्यथा कारवाईला सामोरे जा

गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांच्या ग्रामसेवकांना आढावा बैठकीत सूचना

कराड – तालुक्‍यातील अनेक ग्रामपंचायतीची घरपट्टी व पाणीपट्टीची करवसुली मोठ्या प्रमाणात थकीत आहे. संबंधित ग्रामपंचायतींनी येत्या आठ दिवसांच्या आत संपूर्ण करवसुली करावी; अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांनी ग्रामसेवकांना दिला. येथील पंचायत समितीच्या वतीने ग्रामसेवकांची आढावा बैठक घेण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विस्तार अधिकारी दळवी, गायकवाड, विभूते यांच्यासह सर्व गावांचे ग्रामसेवक उपस्थित होते. बैठकीत घरपट्टी, पाणीपट्टी करवसुलीसह इतर विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.

मार्च महिन्यामध्ये आर्थिक वर्ष संपत असल्याने वर्षभरातील करवसुलीचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करणे गरजेचे होते. मात्र, अनेक ग्रामपंचायतींनी हे उद्दिष्ट पूर्ण केले नसल्याचे निदर्शनास आले आहे. येत्या आठ दिवसांत उर्वरित करवसुली न झाल्यास संबंधित ग्रामसेवकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, अशा सक्‍त सूचना डॉ. पवार यांनी यावेळी केल्या.
याबरोबरच शासनाच्या सर्व योजनांची गावोगावी काटेकोरपणे पूर्तता करण्याबाबतही मार्गदर्शन केले. हरित महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने ग्रामपंचायतीसाठी ठरवून दिलेले वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा अटोकाट प्रयत्न करावा. ते म्हणाले, वातावरणातील बदलांना झाडांची कत्तल कारणीभूत ठरत आहे. गावोगावी लागणाऱ्या वणव्यांमुळे वृक्षसंपदा संपत चालली आहे.

एकीकडे वृक्षलागवड केली जात आहे. तर दुसरीकडे वणव्यांमुळे वृक्षसंपदेचा नायनाट होत आहे. त्यामुळे अभियान राबवूनही त्याचा फारसा उपयोग होत नाही. त्यासाठी गावातील प्रत्येक व्यक्‍तीला त्यांची जबाबदारी समजावून देऊन वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करावे. या अभियानात सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, शाळांचे विद्यार्थी, शिक्षक यांना सामावून घ्यावे, असे आवाहन डॉ. पवार यांनी केले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्व नियमांचे पालन करण्याबाबत सूचना केल्या.

अपंगांसाठीच्या खुर्च्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये असणे आवश्‍यक असून येत्या दहा तारखेपर्यंत त्या उपलब्ध कराव्यात. ज्या गावांमध्ये अपंग व्यक्‍ती नसतील त्यांनी त्या खुर्च्यांचा उपयोग ज्येष्ठ नागरिकांसाठी करावा, अशा सूचना विस्तार अधिकारी गायकवाड यांनी केल्या. यावेळी ग्रामसेवकांनी करवसुलीसाठी येत असलेल्या अडचणींसह इतर अडचणी मांडल्या. मान्यवरांनी त्याबाबत योग्य मार्गदर्शन केले. यावेळी विस्तार अधिकारी विभूते यांनी आभार मानले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.