ऍमेझॉन, फ्लिपकार्टकडून दंड वसुली करा

हरित लवादाचा आदेश

नवी दिल्ली – ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट या कंपन्यांकडून पर्यावरणाला हानी पोहोचवण्याचे जे प्रकार सुरू आहेत त्याचे ऑडिट करून त्यांच्याकडून दंड वसुली करा, असा आदेश हरित लवादाने दिला आहे. या दोन्ही कंपन्यांकडून पॅकिंगसाठी मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचा वापर केला जात असल्याची तक्रार आहे त्या अनुषंगानेही या दोन्ही कंपन्यांच्या कामकाजाची तपासणी केली जाणार आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला या संबंधात आधी पाहणी करण्यास सांगण्यात आले होते. त्यांनी या अनुषंगाने जो अहवाल दिला आहे त्यात या दोन कंपन्यांकडून पर्यावरणविषयक कायद्याची अंमलबजावणी का केली जात नाही याची कारणमीमांसा करण्यात आली आहे. पण त्यावर या दोन्ही कंपन्यांनी काय उपाययोजना केली आहे याची माहिती सीपीसीबीने या अहवालात दिलेली नाही असे हरित लवादाचे अध्यक्ष न्या. ए. के. गोयल यांनी म्हटले आहे.

त्यामुळे या कंपन्यांच्या एकूणच साऱ्या ऍक्‍टिव्हिटीचे पर्यावरण ऑडिट करून त्यांच्याकडून जर काही भंग झाला असेल तर कायद्यानुसार त्यांच्याकडून दंडाची वसुली व्हावी, असेही हरित लवादाने म्हटले आहे. 14 ऑक्‍टोबरपर्यंत या विषयीची ऍक्‍शन टेकन रिपोर्ट सादर करावा असा आदेशही त्यांना देण्यात आला आहे.

पॅकेजिंगसाठी या दोन्ही कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक वापरले जाते. त्यावर हरित लवादाकडून विशेष लक्ष देण्याची सूचना करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.