पोलीस पैसे मागत असल्यास फोन रेकार्ड करा – पोलीस आयुक्त

पिंपरी – कोणत्याही कामासाठी पोलीस पैशाची मागणी करीत असतील तर त्यांचे कॉल रेकार्ड करा. तसेच व्हॉटस्‌ऍप कॉल केल्यास दुसऱ्या फोनवरून ते फोन रेकॉर्ड करून मला पाठवा, असे आवाहन पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी केले आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस त्यांनी केलेल्या कामासाठी तक्रारदार, नागरिक यांच्याकडून पैसे मागत असतील तर त्यांचे मोबाईल संभाषण रेकॉर्ड करा. व्हाट्‌सअप कॉलद्वारे संभाषण होत असेल तर दुसऱ्या फोनच्या साहाय्याने संभाषण रेकॉर्ड करून पोलीस आयुक्तांना (मोबाईल क्रमांक – 9134424242) पाठवावे. पोलीस अधिकारी, अंमलदार दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. शहरातील अवैध धंद्यांबाबत देखील आयुक्तांना नागरिकांनी माहिती द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान पोलीस आयुक्तालयात कार्यक्षेत्रातील नागरिकांचा अगदी किरकोळ समस्यांपासून गंभीर प्रकारणांमधील नागरिकांचा दररोज राबता असतो. त्यामुळे आयुक्त कार्यालयात काम करणारे कर्मचारी तसेच येणारे नागरिक यांना करोना साथीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका संभवतो. नागरिक आयुक्तांची भेट घेतल्यानंतर त्यांच्यासोबत फोटो देखील काढतात. अनेकदा नागरिक करोनाच्या नियमांचे पालन करताना आढळत नाहीत.

अत्यावश्‍यक कामासोबतच अनावश्‍यक गर्दी देखील आयुक्त कार्यालयात होत असते. त्यामुळे करोना साथीच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी नागरिकांनी आयुक्त कार्यालयात न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी नागरिकांना भेटण्यासाठी सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या तीन दिवशी दुपारी तीन ते पाच ही वेळ ठेवली होती. या वेळेत आयुक्त दरबार घेऊन नागरिकांच्या समस्या ऐकत. मात्र करोनामुळे हा दरबार देखील करोना साथ आटोक्‍यात येईपर्यंत रद्द करण्यात आला आहे. एखाद्या प्रकरणात आयुक्तांची भेट घेणे अत्यावश्‍यक असेल तर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून पूर्वनियोजित वेळ घेऊन आयुक्तांना भेटता येईल. ज्या नागरिकांच्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी असतील त्यांनी आयुक्तांना लेखी तक्रार पाठवावी, असेही सांगण्यात आले आहे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.