4 महिन्यांत पालिकेस विक्रमी उत्पन्न

पुणे – वाढलेली मिळकतकर वसुली आणि राज्य शासनाकडून नियमित मिळणाऱ्या वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) अनुदानामुळे 2019-20 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या 4 महिन्यांतच (1 एप्रिल ते 31 जुलै 2019) महापालिकेच्या तिजोरीत तब्बल 1,855 कोटींचा महसूल जमा झाला आहे. गेल्या काही वर्षांत पहिल्या 4 महिन्यांत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात महसूल जमा झाला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

महापालिकेला 4 महिन्यांत सर्वाधिक 828 कोटींचे उत्पन्न मिळकतकराच्या माध्यमातून मिळाले आहे, तर जीएसटी अनुदानापोटी तसेच एलबीटी सेस पोटी राज्य शासनाकडून 716 कोटींचे अनुदान मिळाले आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर बांधकाम विकास विभागाच्या परवानगी शुल्कातून 230 कोटींचा महसूल मिळाला आहे. तर पाणीपुरवठा, अग्निशमन, अतिक्रमण, पथविभाग, मालमत्ता विभाग, आकाशचिन्ह विभाग तसेच चाळ विभागाकडून सुमारे 75 कोटींचा महसूल मिळाला आहे.

शिल्लक उत्पन्न बॅंकेत ठेवणार
महापालिकेस 1,855 कोटींचा महसूल मिळाला असला तरी, त्यातील सर्वाधिक चारशे कोटींचे उत्पन्न कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च झाले आहे. तर काही मागील वर्षाची आर्थिक बिले, भामा-आसखेड प्रकल्प भूसंपादन, पाटबंधारे विभागाची बिले, विद्युत बिलांसाठी खर्च झाले आहे. त्यामुळे शिल्लक रक्‍कम प्रशासनाकडून राष्ट्रीयकृत बॅंकेत फ्लेक्‍झी बॅंक खात्यात ठेवली जाणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.