लसीकरणाचा विक्रम अन् राष्ट्रवादीचा गंभीर आरोप; म्हणाले,”विक्रमासाठी १५ ते २० दिवस आधी…”

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने  देशात अडीच कोटी लसींचे डोस देण्याचा विक्रम करण्यात आला आहे.  आतापर्यंत सर्वांत वेगाने लस देण्याची ही पहिलीच वेळ होती. पंतप्रधान मोदी यांना ही वाढदिवसाची भेट आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी म्हटले होते. त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यापुढेही २.१ कोटी लसीकरण होणारे अनेक दिवस येवोत. आपल्या देशाला अशाच वेगाची गरज आहे असे ट्विट करत म्हटले. मात्र आता या लसीकरणाच्या विक्रमावरुन विरोधी पक्षांनी भाजपा आणि केंद्र सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.

“पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी लसीकरणाचा विक्रम करण्यात यावा यासाठी १५ ते २० दिवस आधी लसीकरण कमी करण्यात आले”, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी हा आरोप केला आहे.

“मोदींच्या वाढदिवसानिमित्त लसीकरणाचा विक्रम करण्यात आला आहे. जवळपास पावेन तीन कोटी लोकांना लसीचे डोस देण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. जर आज हे लसीकरण पावने तीन कोटी झालं आहे तर तेवढंच आज, उद्या किंवा महिनाभर का होणार नाही. एवढ्या मोठ्या लसीकरण करण्यासाठी १५ ते २० दिवस लसीकरण कमी करण्यात आलं. कारण पंतप्रधानांच्या वाढदिवशी विक्रम करण्यात येईल. जर आधीच लोकांना लस देण्यात आली असती तर त्याचा फायदा अधिक झाला असता पंतप्रधानांच्या वाढदिवशी विक्रम करण्यासाठी १५ ते २० दिवस आधी लसीकरण कमी करण्यात आले. कोणत्याही व्यक्तीच्या गौरवासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम अन्यायकारक आहेत,” असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त, देशभरात मोठ्या प्रमाणात लसीकरण कार्यक्रम राबवण्यात आला. त्याच्या परिणामी देशात विक्रमी लसीकरण झाले आहे. बिहारमध्ये लसीचे सर्वाधिक डोस देण्यात आले. को-विन पोर्टलवर उपलब्ध आकडेवारीनुसार, शुक्रवारी रात्री ११:२० पर्यंत दोन कोटी ३७ लाख ७३ हजार लसींचे डोस देण्यात आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत देशभर दिल्या गेलेल्या एकूण लसींच्या डोसची संख्या ७९ कोटी १३ लाखांहून अधिक झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.