पुणे: उत्तरेकडील राज्यांमध्ये असलेली थंडीची लाट आणि देशाच्या पशचिम किनारपट्टीला धडकलेल्या धुळीच्या वादळामुळे वाऱ्याचा वाढलेला वेग, यामुळे शहरातील रात्रीच्या तापमानात कमालीची घट झाली आहे. परिणामी शहरातील किमान तापमानाचा पारा १० अंशावर घसरला असून, नवीन वर्षात प्रथमच नीचांकी तापमान नोंदविण्यात आले आहे.
शहर परिसरात गेल्या आठवडाभर कमाल आणि किमान तापमानात सातत्याने वाढ नोंदविण्यात येत होती. कमाल तापमानात 31 अंशपर्यंत तर किमान तापमानात 17 अंशपर्यंत वाढ झाली होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून हवामान कोरडे झाले असून, उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेचा प्रभाव वाढला आहे.
परिणामी शहरातील कमाल आणि किमान तापमान मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. शहर परिसरात गेल्या २४ तासात किमान तापमान १७ अंशावरून थेट १० अंशावर पोहचले आहे. पुढील तीन ते चार दिवस थंडी कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.