मुंबई – शेअर बाजारात एक महिन्यापासून मंद वातावरण आहे. मात्र एसआयपीच्या माध्यमातून शेअर बाजारात होत असलेली गुंतवणूक वाढत आहे. ऑक्टोबर महिन्यात म्युच्युअल फंडात झालेली गुंतवणूक 41,887 कोटी रुपये या विक्रमी पातळीवर गेली. मासिक पातळीवर ही गुंतवणूक 21.7 टक्क्यांनी वाढली. आक्टोबर महिन्यात एसआयपीच्या माध्यमातून झालेली गुंतवणूक 25,323 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर गेली आहे.
44 महिन्यापासून इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक वाढत आहे. एसआयपीच्या माध्यमातून ऑक्टोबर महिन्यात 25,323 कोटी रुपयांवर गुंतवणूक झाली. सप्टेंबर महिन्यामध्ये ही रक्कम 24,509 कोटी रुपये होती. म्युच्युअल फंड खाती 17 कोटी 23 लाख या विक्रमी पातळीवर गेली आहेत. तर एसआयपीची खाती 10 कोटी 12 लाख या विक्रमी पातळीवर गेली आहेत. याचा अर्थ शिस्तबद्ध गुंतवणूक करण्याकडे कल वाढत असल्याचे म्युच्युअल फंड संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकट छलसानी यांनी सांगितले.
अमेरिकेतील निवडणुकामुळे शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम झाला आहे. चीनने दिलेल्या सवलतीमुळे ऑक्टोबर महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी 94 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली. यामुळे शेअर बाजारात बरेच करेक्शन झाले आहे. याचा फायदा गुंतवणूकदार म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून खरेदी करून घेत असल्याचे दिसून येते. म्युच्युअल फंडाकडे असलेली मालमत्ता आता 67.26 लाख कोटी रुपयांवर गेली आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये ही मालमत्ता 67 लाख कोटी रुपये होती.
करेक्शनच्या संधीचा फायदा –
ऑक्टोबर महिन्यात निफ्टी व सेन्सेक्समध्ये पाच ते सहा टक्क्याचे करेक्शन झाले. इतके मोठे करेक्शन एका महिन्यामध्ये सहजासहजी होत नाही. मार्च 2020 मध्ये असे करेक्शन झाले होते. करेक्शननंतर म्युच्युअल फंडात होत असलेली गुंतवणूक 40 हजार कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. सप्टेंबर महिन्यात म्युच्युअल फंडातून 71,114 कोटी रुपये काढून घेण्यात आले होते. ऑक्टोबर महिन्यामध्ये म्युच्युअल फंडात झालेली एकूण गुंतवणूक 2.4 लाख कोटी रुपये आहे. कर्जरोखे संबंधातील गुंतवणूक 1.57 लाख कोटी रुपयांवर गेली आहे.