“सातारा हिल हाफ मॅरेथॉन’साठी अत्यल्प वेळात विक्रमी नावनोंदणी

सातारा – 25 ऑगस्ट रोजी होणाऱ्या “सातारा हिल हाफ मॅरेथॉन’ स्पर्धेच्या 8 व्या आवृत्तीच्या खुल्या प्रवर्गातील स्पर्धकांसाठी असणारी ऑनलाइन नोंदणी जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून 7 एप्रिल 2019 रोजी पहाटे 5.00 वाजता सुरू झाली आणि अवघ्या 1 तास 15 मिनिटांत बाहेरगावच्या व साताऱ्यातील सुमारे 4000 धावपटूंनी नोंदणी करून एक नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे.

यापूर्वीच सातारा जिल्ह्यातील स्पर्धकांसाठी राखीव असणारी ऑनलाइन नाव नोंदणी 1 एप्रिल रोजी सुरू झाली होती. तब्बल 2000 सातारकरांनी यात फक्त दीड दिवसात विक्रमी नावनोंदणी केली होती. म्हणजेच एकूण 6000 मॅरेथॉनपटूंनी 21 किलोमीटर अंतराच्या मुख्य शर्यतीत सहभाग नोंदविला आहे. यात महिलांची संख्याही लक्षणीय आहे हे विशेष. इतक्‍या कमी वेळेत एवढ्या मोठ्या संख्येने स्पर्धकांनी नाव नोंदणी केली, यावरून या स्पर्धेची लोकप्रियता किती आहे हे दिसून येते.
सातारा शहराला लाभलेले नैसर्गिक वरदान, तसेच स्पर्धेचे केले जाणारे शिस्तबद्ध आणि सुयोग्य नियोजन, सातारकर नागरिकांचा स्पर्धेला असणारा भक्कम पाठिंबा आणि वाढता सहभाग ही यामागची मुख्य कारणे आहेत. सातारची ओळख आता देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय नकाशावर मॅरेथॉनचे सातारा अशी झाली आहे.

सातारा हिल हाफ मॅरेथॉनची नावनोंदणी कधी सुरू होतेय याकडे देशविदेशातील हजारो स्पर्धक अगदी डोळे लावून वाट पाहत असतात आणि ऑनलाईन पद्धतीने नावनोंदणी सुरू होताच केवळ काही तासांतच सर्व जागा भरल्या जातात. नोंद घेण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे पूर्वी सातारकरांची नावनोंदणी करण्यासाठी ऑनलाइन व्यतिरिक्त ऑफलाइन फॉर्म सुद्धा भरून घेतले जात. परंतु त्यामुळे बऱ्याच अडचणी यायच्या, चुकीची माहिती भरली जायची किंवा माहिती संकलित करण्यात अनेक अडचणी येत.

संयोजकांनी हळू हळू लोकांना ऑनलाइनकडे वळविण्याचा प्रयत्न केला व आता गेली दोन वर्षांपासून तर 100 टक्के नावनोंदणी ऑनलाइन केली आहे आणि त्यालासुद्धा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. शिस्त पाळल्यामुळे आणि लोकांना वेळेत नावनोंदणी करण्याचे महत्त्व पटवून दिल्यामुळे आता स्पर्धेच्या तब्बल 5 महिने आधीच सर्व सातारकरांनी नावनोंदणी ऑनलाइन पद्धतीने पूर्ण केली आहे हे खरोखर कौतुकास्पद आहे. हा एक मोठा सकारात्मक बदल आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.