पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – दसऱ्यानंतर दिवाळीतील धनत्रयोदशीच्या दिवशी सोने आणि चांदीची खरेदी मोठ्याप्रमाणात केली जाते. यंदाही सोन्याच्या किंमतीत दोन ते अडीच हजाराने वाढ होऊनही ग्राहकांनी विक्रमी संख्येने खरेदीसाठी गर्दी केली.
धनत्रयोदशीला चांदीची खरेदीही केली जाते.परंतु दरवेळी प्रमाणे यंदाही काहीसा ट्रेंड बदलला आहे. सोन्याच्या नाण्यांनाही जादा मागणी यंदा असल्याचे सराफांचे म्हणणे आहे. याबाबत “प्रभात’ने व्यापाऱ्यांशी साधलेला संवाद.
यंदा सोन्याचे भाव वाढले तरी खरेदीदार कमी झाले नाहीत. लोकांचा सोन्यावरचा विश्वास अबाधित आहे. गुंतवणूक म्हणून आता सोन्याकडे पाहण्याचा कल लोकांचा वाढला आहे. दसऱ्यानंतर गुरुपुष्यामृतालाही चांगला व्यवसाय झाला आणि आता धनत्रयोदशीलाही ग्राहकांचा प्रतिसाद चांगला आहे.
चांदीचा दर ९९ हजारांवर गेला आहे, तरीही त्याच्या क्वाइनची मागणी भरपूर आहे. यंदा हिरे खरेदीलाही चांगला प्रतिसाद आहे. “एलिगंट लूक’साठी हिऱ्यांच्या दागिन्यांची खरेदी केली जाते. – अजित गाडगीळ, पीएनजी अॅंड सन्स
यंदा व्यवसाय चांगला आहे. वेढणी आणि क्वाइन सतत बनवावे लागत आहेत. आताची जनरेशन ही “लाइटवेट ज्वेलरी’कडे झुकताना दिसते. परंतु एखाद्या सणसमारंभाला घसघशीत जास्त वजनाचे दागिनेच खरेदी केले जातात. तरुणांची सोन्यात गुंतवणूक करण्याचे मानसिकता वाढली आहे.
– फत्तेचंद रांका, रांका ज्वेलर्स
बाजारपेठेत सोने-चांदी खरेदीसाठी उत्साह आहे. गुंतवणूक आणि मुहूर्त असा दुहेरी योग साधून खरेदी केली जात आहे. सोन्याची खरेदी ही सुरक्षित, गुंतवणुकीच्या दृष्टीने सोयीची आणि भरपूर परतावा देणारी वाटते त्यामुळेच लोक ते घेतात. कमी सोन्यात मोठ्या आकाराचे दागिने लोकांना आवडतात. त्यामुळे “लाइट स्टाइल ज्वेलरी’ची मागणीही जास्त आहे. – सुरिंदरपाल सिंग, नीळकंठ ज्वेलर्स
यावर्षी हिऱ्यांच्या दागिन्यांना चांगली मागणी आहे. चांदीमध्ये मूर्ती, दिवे यांना चांगला उठाव आहे. सोन्याचा भाव जास्त आहे; परंतु तरुणांचा सोने खरेदीचा कल यंदा वाढलेला दिसतो. अन्य गुंतवणुकीपेक्षा सोन्याच्या गुंतवणुकीतून एका रात्रीतूनही पैसे उभे राहू शकतात, असा विश्वास लोकांना असतो.
भिशीचा ट्रेण्डही वाढला आहे. हिऱ्याच्या दागिन्यांची मागणी वाढल्याचे कारण हे कॉर्पोरेट लुक, वेस्टर्न कपड्यांवर वापरता येणारी हलकी परंतु सुंदर ज्वेलरी हे आहे.- रोहित रणधीर, आर. आर. रणधीर सराफ
यावेळी चांदीच्या क्वाइनबरोबर गोल्ड क्वाइनलाही मागणी जास्त होती. लक्ष्मीपूजनावेळी या क्वाइनची पूजा होते, त्यावर लक्ष्मीचे चित्र असते. यंदा मोठी खरेदी अनेकांनी केली. दसरा, गुरुपुष्यामृत यानंतर धनत्रयोदशीला ही खरेदी सर्वाधिक होती. – अतुल अष्टेकर, कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स