नवी दिल्ली -देशात बुधवार सकाळपासून 24 तासांत 29 हजार 557 बाधित करोनामुक्त झाले. एकाच दिवसात एवढ्या प्रमाणात रूग्ण बरे होण्याचा नवा विक्रम त्यामुळे नोंदला गेला. करोना संसर्ग झालेले रूग्ण बरे होण्याचे देशातील प्रमाण आता 63.18 टक्के इतके झाले आहे.
बाधित आणि बळींच्या संख्येत दिवसागणिक मोठी भर पडत असली तरी रूग्ण बरे होण्याचे देशातील प्रमाणही लक्षणीय ठरले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या 4 लाख 26 हजारांहून अधिक सक्रिय बाधित आहेत. तर आतापर्यंत 7 लाख 82 हजार 606 बाधित करोनामुक्त झाले आहेत. देशातील सक्रिय बाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या साडेतीन लाखांपेक्षा अधिक आहे.
मागील काही दिवसांत देशातील करोनाविषयक चाचण्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. अवघ्या 3 दिवसांत (सोमवार ते बुधवार) सुमारे 10 लाख चाचण्या झाल्या. त्यामुळे देशात आतापर्यंत झालेल्या चाचण्यांनी दीड कोटीचा टप्पा ओलांडला आहे.