सातारा -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून साताऱ्यात शिंदे गटाच्या पुनर्बांधणीला पुन्हा सुरुवात झाली आहे. त्यामुळे शिंदे यांचे साताऱ्यातील कट्टर समर्थक नीलेश मोरे यांची रस्ते विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदासाठी शिफारस करण्यात आली आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी यासंदर्भातील हालचाली मात्र गतिमान झाल्या आहेत. या वाटचालीवरून शिंदे गटाने साताऱ्यात पुनर्बांधणीचा प्रयोग सुरू केल्याची चर्चा आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या गट बांधणीचा प्रयोग सुरू केला असून तसे आदेशही कार्यकर्त्यांना मिळाले आहेत. जिल्ह्यात शिंदे समर्थक नीलेश मोरे यांचा अपवाद वगळता संपूर्ण शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यामागे उभी राहिली आहे. शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क मंत्री दिवाकर रावते यांनी पुणे येथे बैठक आयोजित केली असून पश्चिम महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने मतदारांच्या याद्या आणि प्रभाग रचना निहाय मतदान केंद्रसंख्या याची यादी मागवण्यात आली आहे.
तत्पूर्वी शिंदे गटाने गटबांधणीची पावले टाकायला सुरुवात केली असून नीलेश मोरे यांची राज्य रस्ते विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदासाठी शिफारस करण्यात आली आहे. नीलेश मोरे शिवसेनेचे शहर प्रमुख म्हणून सक्रिय असताना सातारा नगरपालिकेसाठी प्रभाग क्रमांक पाचमधून त्यांनी शिवसेनेची बांधणी सुरू केली होती. पक्षप्रमुख उद्धव आणि शिंदेसेना असे दोन गट पडल्याने शिवसैनिकांमध्ये चलबिचल आहे.
नीलेश मोरे यांनी एकनाथ शिंदे हेच माझे खरे देव असल्याचे सांगत शिंदे यांची साथ शेवटपर्यंत सोडली नाही. आता शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडल्याने साताऱ्यात नीलेश मोरे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये अनेकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेना नक्की उद्धव यांच्याकडे की शिंदे यांच्या गटात याविषयीसुद्धा वेगवेगळ्या चर्चा होतच आहेत. मात्र, नीलेश मोरे यांनी खरी शिवसेना कोणती या विषयावर बोलायला स्पष्टपणे नकार दिला. माझे राजकीय गुरू एकनाथ शिंदे असून त्यांचा आदेश माझ्यासाठी अंतिम असेल असाच ठेका त्यांनी लावला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिंदे गट सक्रिय राहणार असून त्या पद्धतीने राजकीय चाचपणी सुरू करण्यात आली आहे. विश्वासू आणि निष्ठावान चेहरे शिंदे गटाकडून शोधले जात असून त्याची यादी लवकरच मुख्यमंत्र्यांचे कामकाज सांभाळणाऱ्या कोअर विभागाला सादर केली जाईल, असे नीलेश मोरे यांनी सांगितले.