बुकारेस्ट – युक्रेनला “नाटो’मध्ये सामील करून घेण्याच्या प्रक्रियेवर आता पुन्हा एकदा विचार विनिमय सुरू होणार आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरू होऊन 10 महिने झाले आहेत. या युद्धात युक्रेनची अपरिमित हानी झाल्याच्या पार्श्वभुमीवर युक्रेनला “नाटो’मध्ये सामील करून घेण्याच्या प्रयत्नांना पुन्हा सुरुवात केली जाणार आहे.
रोमानियाची राजधानी बुकारेस्टमध्ये संसदेच्या प्रासादामध्ये “नाटो’च्या सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची दोन दिवसांची परिषद होणार आहे. अमेरिकेचे तत्कालिन अध्यक्ष जॉर्ज डब्लू बुश यांनी 2008 मध्ये युक्रेन आणि जॉर्जियाला “नाटो’मध्ये सहभागी करून घेण्याबाबत आपल्या मित्र देशांना राजी केले होते.
“नाटो’मध्ये सहभागी होण्याबाबत युक्रेन आणि जॉर्जियाच्या अपेक्षेचे “नाटो’सदस्य देशांनीही स्वागतच केले होते. तेंव्हा रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी हे दोन देश “नाटो’मध्ये सहभागी होणे म्हणजे रशियाच्या सुरक्षेला थेट धोका असल्याचे म्हटले होते. त्यानंतर रशियाने जॉर्जियावर हल्ला केला होता.
याला आता 14 वर्षे होत आहेत. युक्रेनला “नाटो’मध्ये सहभागी करून घेण्याच्या प्रक्रियेला चालना देण्यासाठी रोमानियामध्ये “नाटो’च्या सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री एकत्र येणार आहेत. “नाटो’ युक्रेनला शेवटपर्यंत पाठिंबा देईल, असे “नाटो’चे जेन्स स्टॉलेन्बर्ग यांनी म्हटले आहे. अलिकडेच फिनलंड आणि स्विडन या देसांनीही “नाटो’मध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
नॉर्थ मासेडोनिया आणि मॉन्टेनेग्रो हे देशदेखील अलिकडेच “नाटो’मध्ये सामील झाले आहेत. “नाटो’च्या अन्य सदस्यांप्रमाणेच युक्रेनलाही लष्करी मदत पुरवली जाण्याबात या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. युक्रेनला “नाटो’मध्ये सामील करून घेतले गेले तर या युद्धात रशियाविरोधात एकदम 30 देशांची आघाडी उतरू शकते.