नवी दिल्ली – पोलाद, अक्षय ऊर्जा आणि इतर क्षेत्रात संयुक्त प्रकल्प उभारण्यासंदर्भात गौतम अदानी समूहाने दक्षिण कोरियातील पोस्को कंपनीबरोबर सहकार्य करार केला आहे.
या करारांतर्गत पाच अब्ज डॉलर म्हणजे 40 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प उभारण्याच्या शक्यतेवर विचार केला जाणार आहे.
अदानी समूहाने सांगितले की, गुजरातमधील मुंद्रा येथे पर्यावरणस्नेही एकात्मिक पोलाद प्रकल्प उभारला जाणार आहे. जागतिक पातळीवरील पोस्को कंपनीशी यासंदर्भात सहकार्य करार करण्यात येणार आहे.
आर्थिक, तांत्रिक आणि इतर क्षेत्रात समन्वयाने काम करण्याच्या शक्यतेवर विचार करण्यात येईल. या सहकार्य कराराचे मुख्य सूत्र हे हरित ऊर्जा असे असणार आहे. पोस्कोच कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या अनुषंगाने भारतात अनेक प्रकल्प सुरू करण्याबाबत आम्ही आशावादी आहोत.
अदानी उद्योग समूहाचे प्रमुख गौतम अदानी म्हणाले की, या सहकार्य कराराच्या माध्यमातून आम्ही भारत सरकारची आत्मनिर्भर योजना अंमलात आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. पोस्को उद्योग समूह भारतात कार्यरत असून पुणे, दिल्ली, चेन्नई आणि अहमदाबादमध्ये या कंपनीचे प्रकल्प आहेत.