“एसएनडीटी’ला स्वतंत्र इन्क्युबेशन सेंटर म्हणून मान्यता मुख्य बातम्याlatest-newsTop News By प्रभात वृत्तसेवा On January 23, 2021 10:04 pm Share मुंबई : राज्यातील महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीने श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाला महिलांकरिता एक स्वतंत्र इन्क्युबेशन सेंटर म्हणून मान्यता दिली आहे. यामुळे महिला उद्योजकतेला मोठी चालना मिळेल, अशी माहिती कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली. “एसएनडीटी’ हे भारतातील पहिले महिला विद्यापीठ असून महाराष्ट्रातील एकमेव शासकीय महिला विद्यापीठ आहे. महिलांचे नेतृत्व असलेल्या स्टार्टअप्सना प्रारंभिक टप्प्यात मार्गदर्शन करणे, अर्थसहाय्य करणे, विकसित स्टार्टअप्सना अधिकृत निधीकरिता स्टार्टअप परिसंस्थेतील गुंतवणूकदारांशी समन्वय साधून देणे, संशोधन व विकास क्षेत्रात तसेच तांत्रिक उद्योजकता क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या महिलांना विशेष अनुदान पुरविणे, विकसित स्टार्टअप्सच्या विस्तृतीकरणासाठी व त्यांच्या उद्योगास चालना देण्यासाठी विविध एक्सलरेटर कार्यक्रम राबविणे इत्यादीकरिता हे इन्क्युबेशन सेंटर काम करेल. या उपक्रमाने महिला उद्योजकतेला मोठी चालना मिळेल व देशात महाराष्ट्र एक उदाहरण प्रस्थापित करेल, असा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला. डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा nawab malikSNDT