पुणे – महापालिकेने प्रस्तावित केलेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता अडचणीत आली आहे. हे महाविद्यालय उभारण्यात येणाऱ्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाच्या जागेच्या मालकीबाबत “महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स’ने (एमयूएचएस) आक्षेप घेतला आहे.
ही जागा सध्या महापालिकेच्या मालकीच्या असून त्यावर महाविद्यालय उभारायचे झाल्यास, ती ट्रस्टच्या मालकीची असणे अपेक्षित आहे. त्यामुळे ही जागा ट्रस्टला कशा प्रकारे हस्तांतरित करायची यावर तोडगा निघेपर्यंत ही मान्यता लांबणीवर पडणार आहे.
या नियोजित वैद्यकीय महाविद्यालयाला हळूहळू गती मिळत आहे. यासाठी डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाची साडेबारा एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. त्याचबरोबर मंगळवार पेठेतील कै. बाबूराव सणस कन्याशाळा आणि कमला नेहरू रुग्णालयाची काही जागाही देण्यात येणार आहे. नाममात्र भाडेकरारावर या जागा ट्रस्टला वापरण्यास देण्यासाठी महापालिका आणि महाविद्यालयाच्या वैद्यकीय शिक्षण ट्रस्टमध्ये नुकतेच करारही झाले आहेत. या करारनाम्यांसह महाविद्यालय उभारणीचा प्रस्ताव महापालिकेने नाशिक येथील “एमयूएचएस’ला पाठवला आहे.
मात्र, ज्या जागेवर महाविद्यालय उभारण्यात येणार आहे, ती जागा ट्रस्टच्या नावे असली पाहिजे, अशी नियमावली असल्याने महापालिका प्रशासनाची अडचण झाली असून त्यावर तातडीने तोडगा काढण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.