पिंपरी – टिंडर ऍपवरून ओळख झालेल्या मित्राने तरुणीला हिंजवडी येथील एका हॉटेलवर नेऊन जबरदस्तीने दारू पाजली. त्यानंतर घरी नेऊन मारहाण करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना शनिवारी (दि. 26) दुपारी चार ते रात्री साडेअकरा या कालावधी घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अभिजीत सीताराम वाघ (वय 28, रा. तापकीर नगर चौक, काळेवाडी) याला अटक केली आहे.
26 वर्षीय पीडित तरुणीने रविवारी (दि. 27) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी अभिजित यांची टिंडर या ऍपवरून ओळख झाली. त्याद्वारे अभिजित याने फिर्यादी तरुणीला शनिवारी दुपारी हिंजवडी येथील हॉटेलवर जबरदस्तीने दारू पाजली.
त्यानंतर अभिजीत याने फिर्यादी तरुणीला त्याच्या घरी नेले. तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला असता तरुणीने त्याला विरोध केला.
त्यावरून अभिजीत याने तरुणीला लाथाबुक्क्यांनी, बुटाने मारहाण करून डोळ्यावर, कानावर आणि तोंडावर मारून जखमी केले. मारहाण केल्यानंतर अभिजित याने तरुणीवर लैंगिक अत्याचार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.