पळसदेव -संपूर्ण राज्यासह पुणे जिल्ह्यात करोनाचा कहर सुरूच आहे. त्यात इंदापूर तालुका देखील मागे नाही. मात्र इंदापूर तालुक्यातील करोनाचे प्रमाण काही प्रमाणात आटोक्यात आल्याने तालुका अनलॉक करण्यात आला आहे.
मात्र, पळसदेव गावात करोनाचे प्रमाण अधिक असल्याने गावात आणखी आठ दिवस लॉकडाऊन वाढवला आहे. गाव संकटात असताना मात्र गावात अवैद्य दारू विक्री जोरात सुरु आहे. गावात बंद असल्याने अनेक मद्य शौकिनांना सध्या घरपोच दारू मिळत आहेत.
काही हॉटेल व ढाबे चालक गावातील नागरिकांना दारूची चढ्या दराने घरपोच सेवा दिली जात आहे. त्यामुळे महिला वर्गामध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे.
पळसदेव गावात सरपंच अंकुश जाधव यांच्या कार्यकाळात दि. 1 ऑक्टोबर 2006 रोजी महिला ग्रामसभेत संपूर्ण दारूबंदीचा ठराव केला होता. या ठरावाला पंधरा वर्षे झाली दारूबंदी आहे.
दक्षता कमिटीच्या सदस्य स्नेहल शहा यांच्या सूचनेनुसार व महिलांच्या मागणीनुसार हा ठराव केला होता. तेव्हापासून दारू विक्री बंद केली होती. मात्र, ऐन साथीच्या काळात सर्वजण घरीच असताना मद्य शौकिनांची तलफ भागवण्यासाठी काही हॉटेल व धाबे चालकांनी घरपोच सेवा सुरु केली आहे.
त्यामुळे पंधरा वर्षांच्या दारूबंदीच्या तिलांजली दिली आहे. केवळ कमी वेळेत अधिक पैसे मिळत आहेत, या लालसेपोटी घरपोच सेवा सुरु आहे.
दारू विक्रीबाबत पोलीस प्रशासनाला माहिती असताना देखील हा गोरखधंदा नेटाने सुरु आहे. पोलीस व विक्रेते यांच्यात आर्थिक तडजोड झाल्याची चर्चा झडली आहे. यात दारू विक्रेते मालामाल होत आहेत. गावात दारू विक्री सुरु झाल्याने छोटे- मोठे वाद निर्माण सुरू आहेत.
लवकरच याचा बंदोबस्त केला नाही तर गावात कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न भविष्यकाळात निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे तातडीने दारू विक्री बंद करावी, अशी मागणी महिलावर्गातून होत आहे.
जर पोलीस प्रशासनाने दारू विकेत्यांना अभय दिले तर महामारीत इंदापूर पोलीस स्टेशनसमोर उपोषण करण्याचा इशाराही महिलांनी दिला आहे.
नावाजलेल्या गावांत पुन्हा कलह होणार?
पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर तालुक्यातील राजकीय व आर्थिकदृष्टया महत्वाचे गाव म्हणून गावाची ओळख आहे. त्यात दारूबंदीचा निर्णय घेऊन गावाने पंधरा वर्षांपूर्वीच आणखी एक मानाचा तुरा रोवला होता.
गावाला तंटामुक्ती समितीचे विशेष बक्षीस देखील मिळाले आहे. मात्र, करोना काळात गावातील शांतात भंग करण्याचे काम दारू विकेत्यांनी सुरु केले आहे. त्यामुळे दारू विक्री तातडीने बंद करावी. याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी महिलांकडून होत आहे.